रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे; तरीही ‘त्याच’ कंपनीला दिले बस स्टॉप बसवण्याचे कंत्राट!

74

मुंबईत उभारण्यात येणाऱ्या ४०० बसस्टॉप पैकी पहिल्या टप्प्यातील १०० बस स्टॉप उभारणीचे काम हाती घेण्यात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील १९४ बेस्ट बस स्टॉपची उभारणी करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या बस स्टॉपच्या कामासाठी ज्या कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे, त्या कंत्राटदाराला जी उत्तर विभागातील काही रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटची कामे बहाल करण्यात आली आहे. महापालिकेच्या जी उत्तर विभागातील रानडे मार्गावरील सेनापती बापट चौकापासून एम बी राऊत मार्ग (दक्षिण) व केळुसकर मार्गाला छेदून जाणाऱ्या रस्त्यांचे काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले. या रस्त्यांचे काम ज्या कंत्राटदाराने केले, त्याच कंपनीला काम देण्यात आल्याने जे रस्त्याचे झाले ते बस स्टॉपचे होणार नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.

(हेही वाचा- मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! गुजरातमध्ये १ हजार कोटींचे ५१३ किलो MD ड्रग्ज जप्त)

मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपनगरांमधील विविध सुविधा आणि विकासकामांसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार उपनगरांमधील ४०० ई-बस स्टॉपचे नुतनीकरण तथा आकर्षक बस स्टॉप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उपनगरांमधील काही रस्त्यांवर पहिल्या टप्प्यात १०५ बस स्टॉप बसवले जाणार आहे. यासाठी सुमारे ४ ते ५ कोटी रुपये खर्च करण्यात मान्यता देण्यात आली. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात मुंबई उपनगरात १९४ विविध ठिकाणी सुंदर आणि वापरायोग्य बस स्टॉपचा पुरवठा करून त्याची उभारणी करण्यात येत आहे.

यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये केवळ दोनच कंपन्यांनी भाग घेतला होता आणि त्यातील आर्मस्टाँग इंडिया कस्ट्रक्शन्स ही कंपनी पात्र ठरली आहे. मुंबई उपनगरातील १९४ बेस्ट बस स्टॉपची उभारणी करतानाच नवीन बसस्टॉपमुळे बाधित होणाऱ्या जागेची तथा पदपथाची दुरुस्ती करणे आदी कामांचा समावेश आहे. यासाठी महापालिकेने निश्चित केलेल्या अंदाजित १७ कोटी ४९ लाख ४८ हजार ४१७ रुपयांच्या तुलनेत संबंधित कंत्राटदार कंपनीने २२ टक्के कमी दरात अर्थात १५ कोटी ८१ लाख ९१ हजार रुपयांची बोली लावत काम मिळवण्याचा प्रयत्न केला.

विशेष म्हणजे या कंत्राटदाराने शिवाजीपार्क येथील रानडे मार्गाला जोडणाऱ्या केळुस्कर रोड व एम. बी. राऊत रोडला छेदून जाणाऱ्या रस्त्याचे काम सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवडयात वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. परंतु वाहतुकीसाठी हा रस्ता खुला केल्यानंतर अवघ्या आठ दिवसांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचे दृष्टीस पडले होते. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर हे तडे खोलवर असल्याचे दिसून आल्यानंतर काही मॅनहोल्सचा भाग तोडून नव्याने बनवण्यात आला. तरीही या रस्त्यावर तडे कायमच आहे. त्यामुळे रस्त्याचे निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या कंपनीलाच बेस्ट बस स्टॉपचे काम मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.