मराठी भाषेत आपल्या अस्तित्वाचा सुगंध: साहित्यिक सदानंद मोरे

159
भाषा ही संस्‍कृतीचा आधार आहे. मराठी भाषा ही संतांनी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांनी व्यवहारात आणलेली भाषा आहे. मराठी भाषेत आपल्या अस्तित्वाचा सुगंध आहे. हे अस्तित्व जपण्यासाठी व त्याद्वारे आपल्या अस्मितेची जाणीव करून देण्यासाठी मराठी भाषा पंधरवडा राबविणे आवश्यक असल्याचे विचार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी मांडले. मुंबई महानगरपालिकेद्वारे आयोजित मराठी भाषा पंधरवडा शुभारंभ कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
 
मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे दरवर्षी  २७ फेब्रुवारी ते १३ मार्च यादरम्यान मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात येतो. यानुसार यंदाही महापालिका आयुक्त तथा1 प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, हा पंधरवडा साजरा करण्यात येत असून या पंधरवड्याचा शुभारंभ कार्यक्रम सोमवारी  २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला होता. या समारंभास अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, सह आयुक्त ( सामान्य प्रशासन विभाग)  मिलिन सावंत, सह आयुक्त ( कर निर्धारण व संकलन)  सुनील धामणे, उपायुक्त (विशेष)  संजोग कबरे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य)  संजय कुऱ्हाडे, उपायुक्त (वित्त) रामदास आव्हाड आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
या कार्यक्रमाला दरम्यान सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत, लेखक, कवी, कीर्तनकार, प्रवचनकार, संत साहित्याचे गाढे अभ्यासक व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी ‘मराठी भाषेचा उद्गम आणि विकास’ याविषयावर उपस्थितांना सांगोपांग मार्गदर्शन केले.
 
यावेळी त्यांनी,आपली मातृभाषा मराठी ही समृद्ध असून तिला २ हजार वर्षांचा संपन्न इतिहास लाभला आहे. मराठी भाषा आपले अस्तित्व अधोरेखित करणारी भाषा असल्याने तिचे जतन, संवर्धन करणे हे आपले कर्तव्‍य आहे. मराठी भाषेचे आपण वारसदार आहोत ही अभिमानाची बाब आहे. मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकला आहेच, आता त्यामध्ये आणखी वृद्धी होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन केले.
 
सातवाहनकालीन प्रशासकीय मराठी ते आजच्या २१ व्या शतकात वापरात येणाऱ्या मराठी भाषेचा विकास या विषयावर त्यांनी उपस्थितांना उदाहरणांसहित इतिहासातील अनेक दाखले ससंदर्भ दिले. तसेच मराठी भाषेच्या विकासात संत साहित्याचे महत्व याबाबत त्यांनी संदर्भांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले.
 
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहआयुक्त (सामान्य प्रशासन)  मिलिन सावंत यांनी केले. यावेळी त्यांनी मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्याबाबतची ऐतिहासिक पार्श्वभूमी विषद केली. तसेच, मुंबई महानगरपालिका प्रशासनात राबविले जात असलेल्या मराठी भाषा विषयक उपक्रमांची माहितीही  सावंत यांनी दिली.दरम्यान, या कार्यक्रमाच्या सुरुवातील महानगरपालिका संगीत – कला अकादमीच्या चमुने मराठी गौरव गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याचे सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी  रवींद्र काळे यांनी केले. तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 

नाट्यगृहाच्या ठिकाणी पुस्तक विक्री दालन

या कार्यक्रमादरम्यान दुरदृश्य प्रणालीद्वारे विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथील पुस्तक विक्री दालनाचा शुभारंभ मा. अतिरिक्त आयुक्त  आशीष शर्मा यांच्या, तर बोरिवली(पश्चिम) परिसरातील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथील पुस्तक विक्री दालनाचा शुभारंभ डॉ. सदानंद मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या दोन्ही ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपातील पुस्तक विक्री दालने प्रकाशकांना उपलब्ध करुन देण्यात येत असून यामुळे वाचनसंस्कतीला निश्चितच हातभार लागणार आहे.

सदानंद मोरे यांचा बोधचिन्ह देऊन सन्मान

शुभारंभ कार्यक्रमाचे प्रमुख वक्‍ते डॉ.  सदानंद मोरे यांचा अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांच्या हस्‍ते शाल व महानगरपालिका बोधचिन्ह देऊन सन्मान करण्‍यात आला. तसेच ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त ‘एकपात्री नाट्यछटा सादरीकरण स्‍पर्धेतील विजेते सुरेखा मराठे, स्वाती शिवशरण, एकनाथ आव्हाड, अनुराधा पेठे , सचिन कांबळे या महापालिका कर्मचा-यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.