‘ती’ गाडी चोरी झालीच नव्हती… वाझेंच्या घराबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज काय दाखवत आहे?

ती गाडी कधीच चोरी झाली नसल्याचा खळबळजनक प्रकार एनआयएच्या तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन या दोन्ही प्रकरणांत रोज नवीन आणि धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यातले राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला आहे, असे सतत बोलले जात असतानाच आता एक धक्कादायक ट्विस्ट या प्रकरणात आला आहे.

स्फोटकांनी भरलेली जी स्कॉर्पिओ गाडी अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, ती कधीच चोरी झाली नसल्याचा खळबळजनक प्रकार, एनआयएच्या तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ही गाडी सचिन वाझे यांच्या घरीच असल्याचे या तपासात समोर येत असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः वाझेंनी आयपीएलच्या सट्टेबाजांकडून मागितली खंडणी ! नितेश राणेंचा आरोप )

कुठे गेले सीसीटीव्ही फुटेज?

२५ फेब्रुवारी रोजी अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, चोरीला गेल्याची तक्रार मनसुख हिरेन यांनी विक्रोळी पोलिस ठाण्यात केली होती. पण कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हिरेन यांनी ही तक्रार केली असल्याचा एनआयएला दाट संशय होता. त्यामुळे खोलात जाऊन तपास करत असताना, ही गाडी चोरीला न जाता सचिन वाझे राहत असलेल्या ठाणे येथील साकेत कॉम्प्लेक्स येथे उभी असल्याचे, तपासात सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच वाझेंच्या घराबाहेर असणा-या सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज सुद्धा बेकायदेशीररित्या काढून घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.

(हेही वाचाः सचिन वाझेंमुळे सरकार बॅकफुटवर, पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक)

पुरावे मिळू नयेत म्हणून…?

स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीबाबत गुन्हे अन्वेषण विभागा(सीआययू)कडून प्राथमिक तपास करण्यात येत होता. तपासकामी मदत मिळावी म्हणून, सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे, यासाठी सीआययूकडून वाझे राहत असलेल्या साकेत सोसायटीला अर्ज करण्यात आला होता. पुरावे मिळू नयेत म्हणून, ते फुटेज नष्ट करण्यात आल्याचे समोर येत आहे. सीसीटीव्ही फुटेज सोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिजीटल व्हिडीओ रेकॉर्डरही नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील गुंता सुटणार की अजून वाढणार, हे आता पुढील तपासात समोर येणार असल्याचे म्हटले जात आहे.

(हेही वाचाः वाझेंनंतर उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार?)

वाझेंच्या सहका-याची यौकशी होणार?

सीआययूचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचे सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाजुद्दीन काझी, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश ओव्हाळ, पोलिस नाईक युवराज शैलार आणि पोलिस काॅन्स्टेबल शिवाजी देसले हे २७ फेब्रुवारी रोजी साकेत सोसायटी येथे पोहोचले. त्यावेळी तपासकामी सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे म्हणून, त्यांनी सोसायटीकडे अर्ज केला होता. त्या अर्जावर सीआययूचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाजुद्दीन काझी यांची स्वाक्षरी असल्याचे, एनआयएकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता काझी यांचीही चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here