प्रदर्शनासाठी कारखान्यातून आणण्यात आलेले ८ कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांसह नोकराने पोबारा केल्याची धक्कादायक घटना दक्षिण मुंबईतील भुलेश्वर येथे घडली. या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात नोकरासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
असा घडला प्रकार
दक्षिण मुंबईतील ताडदेव येथे राहणारे सोन्याचे व्यवसायिक खुशाल टामका यांचा सोन्याचे दागिने बनवून देण्याचा व्यवसाय आहे. गोरेगाव या ठिकाणी टामका यांचा कारखाना असून दक्षिण मुंबईतील भुलेश्वर याठिकाणी त्याचे कार्यालय आहे. टामका यांच्याकडे ८ नोकर मागील १० वर्षांपासून कामवर असून त्यापैकी गणेश हिरामण कुमार (२१) याला ६ महिन्यापूर्वीच कामावर ठेवण्यात आले होते. गणेश हा दागिन्यांची डिझाईन दाखवून इतर व्यापाऱ्याकडून ऑर्डर घेण्याचे काम करीत होता. काही महिन्यात गणेशने मालकाचा विश्वास संपादन केल्यावर मालकाने त्याच्यावर कार्यालयाची जवाबदारी सोपवली होती. गणेश हा दिवसभर कार्यालयात काम करून शेजारीच असलेल्या खोलीत राहत होता.
(हेही वाचा –खुशखबर! देशातील वनक्षेत्रात वाढ)
डिसेंबर महिन्यात वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणी दागिन्यांचे प्रदर्शन असल्यामुळे टामका यांनी गोरेगाव येथील कारखान्यात तयार केलेले वेगवेगळ्या डिझाईनचे सोन्याचे दागिने आणून कार्यलयातील तिजोरीत ठेवले होते. ८ कोटी ११ लाख रुपयांचे दागिने आणि ८ लाख ५७ हजार रुपयाची रोकड असा एकूण ८ कोटी १९ लाख ६७ हजार रुपयाचा ऐवज तिजोरीत ठेवण्यात आला होता. कोवीडमुळे प्रदर्शन रद्द झाल्यामुळे व्यवसायिक टामका यांनी हे दागिने पुन्हा कारख्यानावर न पाठवता दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्यांना देण्यासाठी तिजोरीत ठेवले होते. या तिजोरीची एक चावी नोकर गणेश आणि व्यवसायिक टामका यांच्याकडे होती. १३ जानेवारी रोजी रात्री व्यवसायिक यांनी कार्यालय बंद करून गणेशला लक्ष ठेवण्यास सांगितले होते.
नोकरास शोधण्यास पोलिसांचे पथक राजस्थानकडे रवाना
दुसऱ्य दिवशी टामका हे कार्यालयावर आले असता त्यांना कार्यालयाचे दार उघडे दिसले, त्यांनी आत जाऊन बघितले असता तिजोरी उघडी होती व तिजोरीतील दागिने, रोकड असा एकूण ८ कोटी १९ लाख ६७ हजार रुपयाचा ऐवज गायब होता. व्यवसायिकाने गणेशचा शोध घेण्यासाठी कार्यालयातील सीसीटीव्ही तपासण्याचा प्रयत्न केला असता सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील गायब होता. गणेशचा फोन बंद येत असल्यामुळे कार्यालयाच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गणेश आणि त्याचा मित्र रमेशकुमार प्रजापती हे दोघे तीन भरलेल्या बॅगेसह जात असताना दिसून आले. खुशाल टामका यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नोकराचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक राजस्थानकडे रवाना झाले आहे.
Join Our WhatsApp Community