तालिबानी सरकारचा निर्णय; अफगाणिस्तानात महिलांसाठीचे विद्यापीठ होणार बंद

209

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांविरोधात कठोर आदेश जारी केले आहेत. अफगाणमधील महिलांसाठीचे विद्यापीठ बंद करण्याची घोषणा तालिबानी सरकारकडून करण्यात आली आहे. तालिबानच्या नव्या आदेशानंतर कोणत्याही मुलीला किंवा महिलेला विद्यापीठात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे तालिबानी सरकारच्या निर्णयाचा जगभरातून निषेध केला जात आहे.

उच्च शिक्षण मंत्र्यांच्या एका पत्रानुसार, अफगाणिस्तानमध्ये मुली आणि महिलांना विद्यापीठात प्रवेश देण्यात येणार नाही. उच्च शिक्षण मंत्री मोहम्मज नदीम यांचे हस्ताक्षरदेखील या पत्रावर आहे. या पत्रात पुढील आदेशापर्यंत महिलांचे शिक्षण थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हजारो मुलींचे भविष्य धोक्यात

तीन महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानातील हजारो मुली आणि महिलांनी विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे. या नव्या आदेशामुळे अफगाणिस्तानातील हजारो मुलींचे भविष्य धोक्यात आले आहे. याआधी देखील तालिबानने जेव्हा अफगाणिस्तानवर कब्जा केला. त्यावेळी महिलांच्या शिक्षणाबद्दल आदेश जारी केला होता. या आदेशात पुरुषांच्या महाविद्यालयात महिलांना शिक्षण घेता येणार नाही. तसेच, मुलींना शिकवणारे सर्व शिक्षक या महिलाच पाहिजे.

( हेही वाचा: अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; कारागृहातील मुक्काम वाढला )

जीममध्ये जाण्यासही बंदी

तसेच, तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांना जीममध्ये जाण्यास बंदी केली. एक वर्षांपूर्वी तालिबानने अफगाणिस्तानातील सत्ता हाती घेतल्यापासून महिलांच्या हक्कांवर आणि स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. तालिबानच्या या आदेशाचा अनेक महिलांनी विरोध केला आहे. तसेच, आंदोलनदेखील केले, तालिबानच्या या आदेशाचा जगभरातून निषेध केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.