गेल्या वर्षी बालदिनानिमित्ताने भायखळ्यातील राणीबागेत करिश्मा या साडेसात वर्षांच्या वाघीणीने एका गोंडस वाघीणीला जन्म दिला. दोन महिन्यानंतर ही गोड बातमी मुंबईकरांना समजताच गेल्या पंधरा वर्षांची प्रतीक्षा संपली. या वाघीणीला समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात यश आहे राणीबागेतील जीवशास्त्रज्ञ व जनसंपर्क अधिकारी अभिषेक साटम यांचे. इन्स्टाग्राम असो वा फेसबुक, सगळीकडे मायलेकींचे एकमेकांसोबतचे खासगी क्षण सहज टिपणा-या अभिषेक साटम यांच्या कॅमे-याने टिपलेल्या छायाचित्रांनी आणि व्हिडिओने धम्माल उडवून दिली.
(हेही वाचा – राणीबागेत जन्मली मुंबईकर वाघीण! ‘वीरा’ तिचे नाव…)
पहिल्या लॉकडाऊन पूर्वी शक्ती आणि करिश्मा ही नरमादी वाघांची जोडी औरंगाबाद येथील प्राणिसंग्रहालयातून राणीबागेत आणली गेली. या दोघांना लॉकडाऊन काळात लोकांच्या गर्दीपासून अलिप्त राहता आले. परिणामी, नव्या वातावरणात मिसळण्यासाठी दोघांनाही अनुकूल वातावरण मिळाले. या दोघांच्या मिलनाचे क्षण राणीबागेतील अधिकारी टिपत होते. दरम्यान गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अल्ट्रासाऊण्ड चाचणीत करिश्माकडून गोड बातमी असल्याची खात्री पशुवैद्यकीय अधिका-यांना झाली. वाघाच्या बछड्याचा जन्म तब्बल ९० ते ११० दिवसांच्या कालावधीनंतर होतो. करिश्माचे आहारही व्यवस्थित सुरु होता. या काळात करिश्माची प्रसूती सुखरुप व्हावी म्हणून शक्ती पूर्णपणे तिची काळजी घेत होता. पिंज-याच्या एका कोप-यात तिच्या सुखरूप प्रसूतीसाठी एक जागा त्याने स्वतः तयार केली. पिंज-याची रचना वन्यजीवांच्या जीवनाची जुळती असली तरीही त्या कोप-यात शक्तीने पालापाचोळा आणून ठेवला. या दोघांच्याही हालचालींवर उद्यान प्रशासन सात ते आठ सीसीटीव्ही कॅमे-याच्या माध्यमातून लक्ष ठेवून होते.
(हेही वाचा – आता लवकरच मेडिकलमध्येही मिळणार कोरोना लस! )
अखेर १४ नोव्हेंबर रोजी बालदिनीच वाघीण जन्मल्याची गोड बातमी उद्यान प्रशासनाला मिळाली. करिश्मा आपल्या तान्हुलीबाबत विशेष काळजी घेत होती. माणूस दिसलाच की तिच्या डरकाळीने सर्वांनाच घाम फुटायचा, हळूहळू आम्हांला या डरकाळीची सवय झाली, अशी माहिती राणीबागेचे जीवशास्त्रज्ञ आणि जनसंपर्क अधिकारी अभिषेक साटम यांनी दिली. चोवीस तास त्यांच्यावर निगराणी ठेवायला, पिंज-याजवळच उभारलेल्या रुममध्ये प्राणी सांभाळणा-या दोन अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली. आता वीरा हळूहळू मोठी होतेय… हे पाहताना राणीबागेतील अधिका-यांना एक वेगळंच आत्मिक समाधान मिळतेय.
तो क्षण टिपताना…
वीराच्या आमगनाच्या बातमीनंतर तिच्या बारशाच्यावेळी राणीबागेत रुळलेली तिची आई आणि ती कशा आहेत, हे दाखवण्यासाठी लपूनच व्हिडिओ शूटिंग करायचे ठरले. दोन आठवड्यांपूर्वीच मुंबईत कडाक्याची थंडी होती. वीराचे आणि करिश्माचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी पिंज-याच्या बाजूला ताडपत्री लावली गेली. ताडपत्रीमधून हळूच लपून पंधरा मिनिटांत दोन्ही मायलेकींच्या लाडीगोळीचा व्हिडिओ आणि छायाचित्रे टिपली गेली. करिश्माला ह्याची जाणीव होताच सर्वांनी ताबडतोब काम थांबवले.
बापमुलीचा क्षण
स्वतःचा बछडा असला तरीही कित्येकदा नर वाघाकडून स्वतःच्या बछड्याची शिकार होते. त्यामुळे पिंज-याच्या एका कोप-यात शक्ती तर मायलेकी दुस-या कोप-यात आहेत. मधल्या जाळीतून करिश्माने वीराला तिच्या वडिलांची ओळख करुन दिली आहे. आता वीरा स्वतःहून चालत जाळीजवळ जाऊन आपल्या वडिलांना भेटते. आई उभी राहून डरकाळी फोडते तर वीराही डरकाळी फोडते…