नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील नवेगाव खैरी जलाशयात सापडलेल्या मृत वाघाचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता उपसंचालक प्रभुनाथ शुक्ल यांनी व्यक्त केली. सोमवारी रात्री वाघाचा जलशयात तरंगता मृतदेह आढळून आला होता.
कोपेसरा संरक्षण झोपडीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवेगाव खैरी जलाशयात काठापासून सुमारे 500 मीटर अंतरावर वाघाचे शव तरंगताना आढळले. रात्री नऊ वाजता बोटीतून पॉईंटवर पोहोचल्यावर वाघाचा मृत्यू झाल्याचे कर्मचार्यांना समजले . पाण्याचा प्रवाह आणि रात्रीची वेळ यामुळे मृतदेह बाहेर काढता आला नाही. मात्र 23 ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता वनाधिकाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने वाघाच्या शरीरावरील सर्व अवयव निखळले होते. वाघाच्या शरीरावर कुठेही विषबाधा किंवा विद्युत शॉकच्या जखमा दिसून आल्या नाहीत. त्यामुळे वाघाच्या घातपाती मृत्यूची शक्यता नसल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले.
( हेही वाचा: संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांवर गुन्हा दाखल; 38 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप )
गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र या संस्थेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ मयूर पावसे आणि डॉ सुजित कोळुंगुटे यांनी वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. यावेळी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालिका श्रीलक्ष्मी अन्नाबथुला, उपसंचालक प्रभुनाथ शुक्ल, सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर यांच्यासह राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सदस्य उधमसिंग यादव आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) प्रतिनिधी म्हणून मंदार पिंगळे आदी अधिकारी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community