भाजपने दिलेल्या ‘वाघा’ला शिवसेनेने राणीबागेत पाठवले

168

वाघ हे शिवसेनेचे बोधचिन्ह असून मागील युती सरकारमधील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पक्षाचे प्रतिक असलेल्या वाघाचे एक प्रतिक म्हणून भेट दिली होती. ७ फूट लांब असलेली वाघाची प्रतिकृती मातोश्रीत शोभून दिसेल म्हणून तत्कालिन वनमंत्र्यांनी भेट दिली होती. परंतु ही वाघाची प्रतिकृती उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीत न ठेवता राणीबागेत पाठवून दिली. त्यामुळे मातोश्रीलाही नकोसा झालेला वाघ नकोसा झाल्याने विद्यमान सरकारमधील वनमंत्र्यांनी महाराष्ट्रातील वाघाला गुजरातला पाठवून गुजरातचे सिंह राज्यात आणण्याचा तर विचार केला नसेल ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जानेवारी २०१६ मध्ये भाजप- शिवसेना युतीचे सरकार असताना शिवसेनेतील ताणले गेलेले संबंध सुधारण्यासाठी भाजपच्या वतीने अनोखे गिफ्ट देण्यात आले होते. उध्दव ठाकरे हे एक वन्य जीवांचे छायाचित्रण करणारे (वाईल्ड लाईफ फोटोग्राफर)  असल्याने तसेच वाघांचे त्यांना विशेष आकर्षण असल्याने, शिवाय शिवसेना पक्षाचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या वाघाची प्रतिकृती तत्कालिन वनमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी मातोश्रीवर जाताना भेट म्हणून दिली होती. वाघाची ही प्रतिकृती ७ फूट लांब, साडेतीन फूट रुंद आणि जवळपास ५५ किलो वजनाची होती. ही प्रतिकृती भेट दिल्यानंतर काही महिने मातोश्री निवासस्थानी ठेवण्यात आली होती. हा वाघ म्हणजे शिवसेना भाजप युतीचे प्रतिक असून यातून आम्ही सेव्ह दि  टायगर्स या मोहिमेचाही प्रसार करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते.

( हेही वाचा: PFI वर बंदी घालण्यामागची केंद्र सरकारने सांगितली ‘ही’ कारणं )

परंतु पुढे भाजपचे हे गिफ्ट नकोसे झाल्याने या वाघाची प्रतिकृती काही वर्षांपूर्वी भायखळा राणीबागेत पाठवण्यात आली. त्यानंतर या वाघाची प्रतिकृती आता राणीबाग प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ संजय त्रिपाठी यांच्या दालनाबाहेर प्रदर्शनी भागात ठेवण्यात आली आहे.  वाघाच्या सोबतीला पेग्विनचीही प्रतिकृती तिथे ठेवण्यात आली आहे.

मात्र, आता २०१९मध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली असली तरी प्रत्यक्षात शिवसेनेने भाजपला बाजूला करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्यात स्थापन झालेले ठाकरे सरकार अडीच वर्षांमध्ये बरखास्त होताच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पुन्हा एकदा वनमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. वनमंत्री बनल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंहाची जोडी येणार असून यामध्ये गुजरातचा सिंह महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राचा वाघ हा गुजरातमध्ये जाणार असल्याचे घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सरकार गेल्यानंतर पक्ष फुटीनंतर ज्या पक्षाचे प्रतिक वाघ आहे, त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. आपण दिलेल्या वाघाला जर मातोश्रीत जागा नसेल तर त्यापेक्षा सेव्ह दी टायगर्सची मोहिम यशस्वी करण्यासाठी येथील काही वाघ गुजरातला पाठवून त्यांचे संरक्षण तर करण्यासाठी हा निर्णय घेतला नसेल की अशाप्रकारे वाघ गुजरातला पाठवून शिवसेनेला काही संदेश भाजप देण्याचा प्रयत्न तर करत नाही ना असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.