बेस्ट मधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सकस आहार मिळावा यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी अक्षय चैतन्य योजना सुरु केली असून बेस्टच्या १३ आगारांमधील उपहारगृहांमध्ये टचस्टोन फाऊंडेशनच्यावतीने १८ रुपयांमध्ये नाश्ता आणि ३५ रुपयांमध्ये जेवण पुरवले जाणार आहे. १३ आगारांमधील उपहारगृहांचे कंत्राट तडकाफडकी संपुष्टात आणून सत्ताधारी शिवसेनेच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या नाश्त्याच्या मेनूमधून मराठा मोळा बटाटा वडाच गायब आहे. शिवसेने वाढवताना शिवसैनिकांना वडापावचा हातगाड्या लावण्यास प्रवृत्त केल्या होत्या, तसेच शिवसेनेने शिव वडाचे ब्रँडींग केले होते. परंतु मराठमोळे कर्मचारी असलेल्या बेस्टमध्येच शिवसेनेला आपलासा वाटणारा बटाटा वडा ठेवण्याची सक्ती कंत्राटी संस्थेला करावीसी वाटली नाही. त्यामुळे बेस्टमध्ये दक्षिणेतील खाद्यपदार्थांना पसंती देताना शिवसेना मुंबईकरांच्या आवडत्या बटाटा वड्याला विसरली की काय अशी चर्चा कर्मचाऱ्यांमधून ऐकायला येवू लागली आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’चे जुने स्मार्टकार्ड ८ दिवसांत होणार बंद )
बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या पुढाकाराने बेस्टमध्ये राबवण्यात येणाऱ्या अक्षय चैतन्य योजनेचा शुभारंभ सोमवारी २ मे २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते बेस्ट उपक्रमाच्या कुर्ला आगारात झाले. या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी अक्षय चैतन्य योजनेचे अमित आसना दास तसेच शिवसेना आमदार संजय पोतनीस, बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर, अनिल पाटणकर, अनिल कोकीळ, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आणि बेस्ट मधील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ही योजना बेस्टच्या प्रवाशांकरिताही लागू करण्याचा मनोदय महाव्यवस्थापक यांनी व्यक्त केला. यावेळी बेस्टला आर्थिक निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.
ही योजना बेस्ट उपक्रमाच्या तेरा आगारांमध्ये कार्यान्वित करण्यात येत आहे
बेस्ट उपक्रमाच्यावतीने अक्षय चैतन्य योजना ८ एप्रिलपासून वडाळा व कुलाबा या दोन आगारांच्या उपहारगृहांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आली होती. यामध्ये नाश्ता १२ रुपये व जेवण ३५ रुपये अशाप्रकारे दर आकारले होते. परंतु प्रत्यक्षात १३ आगारांमध्ये ही योजना राबवताना नाश्त्याचा दर पाच रुपयांनी वाढून १८ रुपये एवढा करण्यात आला आहे, तर जेवणाचा दर ३५ रुपये एवढाच ठेवला आहे.
विशेष म्हणजे प्रायोगिक तत्वावर ही योजना दोन आगारांमध्ये राबवतानाच २८ एप्रिल रोजी १५ उपहारगृहांच्या चालकांना नोटीस देऊन जागा खाली करण्याच्या सूचना केल्या होत्या. तर ही अक्षय चैतन्य योजना केवळ १५ दिवस प्रायोगिक तत्वावर राबवून त्यांना घाईघाईत हे कंत्राट देण्याचा घाट बेस्ट उपक्रमाने घातला आहे.
विशेष म्हणजे या अक्षय चैतन्य योजना टच स्टोन फाऊंडेशनच्या मदतीने राबवली जात असून सकाळच्या नाश्तामध्ये उपमा,पोहा,साबुदाना खिचडी, ढोकला चटणी दालिया उपमा,आदींचा समावेश आहे. परंतु मराठमोळ्या बटाटा वडाचा समावेश नाही. शिवसेनेच्या उपस्थित ही योजना राबवताना त्यांना बटाटा वडाचा विसर कसा काय पडला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेस्ट समितीचे माजी ज्येष्ठ सदस्य सुनील गणाचार्य यांनी बेस्टला फॅक्टरी ऍक्ट लागू होतो आणि कोणत्याही जागा निविदा न काढता, करार न करता देता येत नाही,असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वीच्या कंत्राटदारांना अनुदान देवून सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात होते. यासाठी २४ तास उपहारगृह सुरु असायची. पण योजनेतंर्गत सकाळी व दुपारी ठराविक वेळेतच हा आहार मिळणार असून पहाटे चारवाजता ड्युटीवर येणारा कर्मचारी व रात्रभर सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना ही सेवा मिळणार नाही. त्यामुळे यापूर्वी आगारांच्या मोकळ्या जागा घशात घातल्या, तशाच आता बांधिव जागा घशात घालण्याचा डाव आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार संशयास्पद असून प्रक्रिया पूर्ण न करता अक्षय चैतन्य योजना राबवून कंत्राट देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप गणाचार्य यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community