जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर चार लेनच्या बोगद्याचे काम सुरु असताना, गुरुवारी रात्री या बोगद्याचा भाग कोसळला. 10 लोक आतमध्ये अडकले होते. यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले असून, 7 ते 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ऍम्बुलन्स घटनास्थळी दाखल
रामबन जिल्ह्यातील खुनी नाल्यावर 4 लेन बोगद्याचे काम सुरू आहे. या बोगद्याच्या तोंडावरील कामाचे ऑडिट सुरु असताना, हा अपघात झाला. पोलिसांनी आणि भारतीय सैन्याने तातडीने रात्रीच्या अंधारातच मदतकार्य सुरु केले. या ढिगाऱ्याखाली ऑडिट करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी अडकले आहेत. सुमारे 7 ते 8 लोक अद्याप आतमध्ये अडकले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बनिहालहून काही ऍम्बुलन्स घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.
( हेही वाचा: केतकी चितळेला अॅट्रोसिटी अंतर्गत अटक; न्यायालयाने 5 दिवसांची सुनावली कोठडी )
बचावकार्य सुरु
घटनेसंदर्भात रामबन जिल्ह्याचे उपायुक्तांनी सांगितले की, मेकरकोट भागात महामार्गाच्या खुनी नाल्यावर बोगद्याचे काम सुरु होते. त्याचा एक भाग कोसळला आहे. सात ते आठ जण ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. ही घटना घडली तेव्हा बोगद्यासमोर बुलडोझर आणि ट्रकसह अनेक मशिन आणि वाहने उभी होती. बोगदा कोसळल्याने त्यांचेही पूर्ण नुकसान झाले आहे. रामबनचे उपायुक्त मसरतुल इस्लाम आणि एसएसपी मोहिता शर्मा बोगद्यात सुरू असलेल्या बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.
Join Our WhatsApp Community