‘त्या’ इनोव्हा मोटारीतील दोघांची ओळख पटली, अटकेची शक्यता! 

या सर्व प्रकरणात दोन कॉन्स्टेबलसह सात अधिकारी यांची एनआयएने चौकशी केली असून त्यात एसीपी, आणि पोलिस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे, असा संशय वर्तवण्यात येत आहे.

110
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ पार्क करताना पाठीमागे असणाऱ्या इनोव्हा कारमधील दोघांची ओळख एनआयएने पटवली आहे. हे दोघे सीआययु(गुन्हे अन्वेषण विभाग)चे पोलिस कॉन्स्टेबल असल्याची माहिती पुढे येत असून, दोघांना अटक करण्यात येणार आहे.

ओळख पटली

मुकेश अंबानी यांच्या अंटिलिया या आलिशान घराजवळ २५ फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी एनआयएने सीआययुचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. या सर्व प्रकरणात एकट्या सचिन वाझे यांचा सहभाग नसल्याचे समोर आलेले आहे. स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार अंटिलिया जवळ उभी करताना, या स्कॉर्पिओ मागे इनोव्हा कारसुद्धा दिसून येत होती. त्यामुळे ती इनोव्हा कार नेमकी कोण चालवत होते आणि त्याचा मूळ मालक कोण याचा तपास एनआयए करत होती. दरम्यान या प्रकरणात आता इनोव्हा मधील दोघांची ओळख पटली आहे.

सात अधिका-यांची चौकशी

एनआयएने ही कार देखील ताब्यात घेतली आहे. या कारमध्ये असणाऱ्या दोघांची ओळख देखील एनआयएने पटवली आहे. हे दोघे पोलिस कॉन्स्टेबल असून त्यांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांना देखील या प्रकरणात अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व प्रकरणात दोन कॉन्स्टेबलसह सात अधिकारी यांची एनआयएने चौकशी केली असून त्यात एसीपी, आणि पोलिस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे, असा संशय वर्तवण्यात येत आहे.

मर्सिडीजही जप्त

दरम्यान मनसुख हिरेन यांनी ज्या गाडीतून शेवटचा प्रवास केला ती मर्सिडीज गाडीसुद्धा काल एनआयएने ताब्यात घेतली आहे. या मर्सिडीज गाडीत अनेक बनावट नंबर प्लेट, एक चेक्सचा शर्ट, पाच लाख रुपयांची रोख रक्कम तसेच नोट काऊंटिंग मशीन, अशा अनेक वस्तू सापडल्या असल्याचे एनआयएचे प्रमुख अनिल शुक्ला यांनी सांगितले. ही गाडी धुळे येथील असल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.