मी पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणताना व्हायरस परत आला! मुख्यमंत्र्यांची कोपरखळी

आम्ही पाच रुपयांत शिवभोजन थाळी देतो. पाच रुपयांमध्ये गरिबांचे पोट भरतो. भरलेली थाळी देतो. कोरोना घालवायला रिकामी थाळी वाजवायला देत नाही, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चे दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हवरून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या याच टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिले. ‘पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणताना व्हायरस परत आला’, अशी कोपरखळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मारली.

देवेंद्र फडणवीसांना टोला!

आपण फेसबुक लाईव्हचा उल्लेख केला. मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावे? काय करू नये? हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला की, जनता मला संपर्क करू लागली, मला प्रतिसाद मिळू लागला. महाराष्ट्रातील जनता मला मानायला लागली. ही माझ्या आयुष्यातील मोठी कमाई आहे. पण, मी नेमके काय करत होतो. आज जी परिस्थिती तयार झाली आहे, कोरोनाची पुन्हा दुसरी लाट येतेय की काय? अशी शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढतेय. लॉकडाउन करायचा की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मी फेसबुक लाईव्हमधून तेच सांगत होतो. निष्काळजीपणा करू नका. कारण हा व्हायरस आहे. तो म्हणतोय मी पुन्हा येईन… पुन्हा येईन. काळजी घ्या. दुर्दैवाने थोडसे इकडे-तिकडे झाले आणि व्हायरस पुन्हा परत आला, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.

(हेही वाचा : राज्यात आया-बहिणींची अब्रू सुरक्षित नाही- मुनगंटीवार!)

भरलेली थाळी, रिकाम्या थाळीत फरक आहे!

आम्ही पाच रुपयांत शिवभोजन थाळी देतो. पाच रुपयांमध्ये गरिबाचे पोट भरतोय. भरलेली थाळी देतोय. कोरोना घालवायला रिकामी थाळी वाजवायला देत नाही. आठ बजे थाली बजाओ! निदान त्या थाळीचा उपयोग आवाज काढायला आहे, ऐवढे तरी गरिबाला कळले. भरलेली थाळी आणि रिकामी थाळी हा या सरकारमधला फरक आहे. तुम्ही गरिबालाच विचारा तुला भरलेली थाळी हवीय की वाजवायला?, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेचा फायदा कोरोना लसीकरणामध्ये होत आहे. सध्या ‘मी जबाबदार’ योजना राबवली जात आहे. सरकार काम करत आहे. देशातील सर्वात मोठे जंम्बो कोविड हॉस्पिटल सरकारने राज्यात उभारले. विरोधकांनी नुसत्याच थाळ्या वाजवल्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला. राष्ट्रपतींच्या भाषणात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत आठ महिन्यांसाठी ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिल्याचे म्हटले, मग ते लगेच श्रीमंत झाले का? गॅस, इंधन कोणतीही दरवाढ झालेली यांना चालते, असे देखील त्यांनी सांगितले. भरलेली थाळी आणि रिकामी थाळीतला फरक गरीबांना कळतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here