राजकीय मतलबासाठी काही महाभाग स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपप्रचार करतात आणि त्यातून राजकीय फायदा मिळवतात. हा प्रकार कालपर्यंत सर्रास सुरु होता, मात्र आता अशा महाभागांची स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने तोंडे बंद केली आहेत. याआधी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने वीर सावरकर यांचा अवमान केला होता, तेव्हा २३ दिवसांच्या लढ्यामुळे ‘एबीपी माझा’ने बिनशर्त माफी मागितली होती. आता २०१६ साली ‘द वीक’ या साप्ताहिकाने वीर सावरकर यांचा अवमान करणारा लेख प्रसिद्ध केला. त्याविरोधात स्मारकाच्या वतीने न्यायालयीन लढा दिल्यावर ५ वर्षांनंतर या साप्ताहिकाने जाहीर माफी मागितली. ‘द वीक’च्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आणि स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी हा न्यायालयीन लढा दिला.
माफीनाम्यात काय म्हणाले ‘द वीक’?
२४ जानेवारी २०१६ रोजी ‘द वीक’ या साप्ताहिकात ‘lamb Lionised’ या शीर्षखाखाली विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी लेख प्रसिद्ध झाला होता. ज्यामध्ये वीर सावरकर यांचा उल्लेख ‘Hero to Zero’ असा करण्यात आला. वीर सावरकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तीमत्वाविषयी गैरसमज पसरवण्यात आला. आमच्याकरता वीर सावरकर हे ‘आदरणीय आणि सर्वश्रेष्ठ’ आहेत. जर या लेखातून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर आम्ही हा लेख प्रसिद्ध केल्याबद्दल क्षमायाचना करतो.
(हेही वाचाः इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती नको असेल, तर वीर सावरकरांना आत्मसात करा! – रणजित सावरकर )
सावरकर स्मारकाच्या लढ्याला अभूतपूर्व यश!
- `द वीक’साप्ताहिकाच्या २४ जानेवारी २०१६ च्या अंकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारा लेख प्रसिद्ध झाला. इतिहास संशोधनाच्या नावावर निरंजन टकले या लेखकाने वस्तुस्थितीचा विपर्यास करून हेतूपुरस्पर महान क्रांतिकारकाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. या लेखात मांडलेले प्रत्येक मुद्दे याआधी देखील अनेकदा खोडून काढले गेले होते असे असताना देखील ‘द वीक’ ने एक नवीन संशोधन सादर करण्याच्या अविर्भावात नुराणी आणि शमसुल इस्लाम यांनी याआधीच केलेले निराधार आरोप पुन्हा सादर केले.
- स्वातंत्र्यवीर सावरकरांवर होणाऱ्या या अवमानाला उत्तर देण्याकरीता २६ जानेवारी २०१६ यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आणि स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी स्मारकात तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. पुढे या लेखावर देश-विदेशातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.
- २३ एप्रिल २०१६ या दिवशी या लेखाची प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांचे कडे रीतसर लेखी तक्रार करण्यात आली. परंतु तेथून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
- स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने अधिवक्ता शरद मोकाशी यांनी ३ मे २०१६ या दिवशी अति. मुख्य महानगर दंडाधिकारी ५वे न्यायालय, भोईवाडा, दादर येथे फौजदारी खटला दाखल केला. या खटल्यात लेखक निरंजन टकले, मलयालम मनोरमा कं. लि. फिलीप मॅथ्यू (managing Editor), जेकब मॅथ्यू (Printer and Publisher), टी.आर. गोपालकृष्णन (Editor in-charge) यांना आरोपी करण्यात आले. ५ वर्षे खटला सुरु होता. तब्बल २१ तारखा पडल्यानंतर १० डिसेंबर २०१९ या दिवशी आरोपींना १५,००० रुपयांच्या जामिन मंजूर करण्यात आला होता.
- स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याबद्दल आपल्या प्रकाशनाला चुकीचे मार्गदर्शन करून आणि अंधारात ठेवून हा लेख लेखकाने लिहिला. तसेच त्याच्याशी प्रकाशनाचा काही संबंध नाही असे म्हणून मलयालम मनोरमा या मासिकाने आपल्या प्रकाशनातून लेखी माफी मागितली.
(हेही वाचाः ३७० हटवले, तरी इस्लामीकरण सुरुच आहे! अंकुर शर्मांची धक्कादायक माहिती )
माफीवीर म्हणणाऱ्यांचा खोटेपणा उघड…
सावरकर यांनी अंदमानात कारागृहात असताना ब्रिटिशांकडे माफी मागितली होती, असा काँग्रेसने स्वातंत्र्यकाळापासून अपप्रचार सुरु केला आहे. जो आजही काँग्रेसची पिलावळ असलेले असा अपप्रचार करत असतात. अशाच माफीनाम्यावरून ‘द वीक’ या साप्ताहिकात निरंजन टकले या लेखकाने लेख लिहून वीर सावरकर यांचा अवमान केला. या लेखानंतर समाजात प्रचंड संताप निर्माण झाला होता. तसेच याची गंभीर दखल स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने घेतली. या साप्ताहिकाच्या विरोधात न्यायालयीन लढा दिला. अखेरीस ‘द वीक’ ने जाहीर माफी मागून वीर सावरकर हे आमच्यासाठी आदरणीय आणि सर्वश्रेष्ठ आहेत, असे मान्य केले. त्यामुळे आता यापुढे वीर सावरकर यांच्याविषयी गैरसमज पसरवणारे, त्यांचा अवमान करणारे या सगळ्या महाभागांना धडा मिळाला आहे. वीर सावरकर यांचा अवमान केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, निरंजन टकले या सर्वांच्या विरोधात स्मारकाने न्यायालयात दाखल केलेले अर्ज प्रलंबित आहेत.
Join Our WhatsApp Community