‘कोविड – १९’ साथरोगाच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमधील डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, संबंधित चमू आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अविरतपणे केलेली रुग्णसेवा आणि विविध स्तरीय कामे निश्चितच कौतुकास्पद आहेत, असे गौरवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले. शीव येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
( हेही वाचा : घरातील धोकादायक कचऱ्यावर प्रक्रिया : आठ ठिकाणी विल्हेवाट केंद्र )
महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत, नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कल्पना मेहता यांच्यासह मोठ्या संख्येने रुग्णालयातील महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत्या.
कौतुकास्पद कामे
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांच्या श्रृंखलेचा समारोपीय कार्यक्रमास माजी अधिष्ठाता डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस, डॉक्टर शैलेश मोहिते या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. शीव येथील रुग्णालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगाने २ मार्च पासून कार्यक्रमांचे आयोजन हे ‘नर्सेस वेल्फेअर असोसिएशन’ आणि ‘जन औषध वैद्यक शास्त्र विभाग’ यांच्या द्वारे संयुक्तपणे करण्यात आले. या अंतर्गत महिला कर्मचार्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने विविध रक्त चाचण्या, कर्करोग निदान चाचण्या, हृदय विद्युत आलेख, अस्थी वस्तुमान घनता इत्यादी चाचण्यांचा समावेश होता.
Join Our WhatsApp Community