वीर सावरकरांना पडलेला प्रश्न, आम्हाला पडेल का?

102

हे तरुण वयच असं आहे की मुलं अस्थिर असतात अनेकदा, त्यांचा स्वभावही असतो लहरी. पारतंत्र्याचा काळच इतका कठीण, की अशी अस्वस्थता सगळीकडेच जाणवायची. तेव्हा विनायकाच्या सोबतीची मुलं सुशिक्षित होती, पण आपल्या देशासाठी आपण करायला हवं खूप काही याचं भान नव्हतं पोरांना! मुलं धाडसी होती, पण हुल्लडबाजीत संपायची त्यांची सगळी शक्ती. इतकी प्रतिभावान होती ही मुलं की यातून उद्या, एखादा कवी, नाटककार, लेखक, अभिनेता, होऊ शकला असता. आपल्यात हे सगळं आहे दडलेलं, आपण त्याचा शोध घेतला पाहिजे हे सांगणारा कुणीतरी हवाच असतो अशा वयात. अशावेळी या पोरांना एका ध्येयाने एकत्र करायला सरसावला नाशिकचा ‘विनायक’. मुलांमधले गुण वाढवत, दोष असतीलच तर पोरांना सांभाळत, त्यांना, सावरत हा विनायक त्यांचा ‘नायक’ झाला.

बँरीस्टर व्हायचं म्हणून लंडनला जाणार हे कारण झालं जगाला सांगण्यासाठी! तिथे गेल्यावर पत्रकार म्हणून सावरकरांनी काळ आणि केसरीला बातम्या पाठवल्या, नंतर इंडिया हाउसची सगळी जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली, तिकडच्या भारतीय मुलांना त्यांनी एकत्र केलं. झीनि मॅझिनी चरित्रलेखन, १८५७च्या समराचं लेखन केलं, त्यावर पुढे बंधीही घातली गेली. मादाम कामांच्याकडून फडकावला गेलेला पहिला ध्वज सावरकरांच्याच कल्पनेतून तर साकारला होता, सेनापती बापट सावरकारांच्याच सांगण्यावरून बॉम्ब बनवण्याच्या पुस्तिका घेऊन आले रशियाहून. त्या पुस्तिका आणि तब्बल २० पिस्तुल त्यांनी गुप्तपणे पोहोचवली महाराष्ट्रात. त्यांना पुढे भारतभर पाय फुटून आणि बॉम्बचे धमाके ऐकू आले बंगालमध्ये. बापरे, क्षणोक्षणी केवढा मोठा धोका पदरी बांधत होता हा माणूस! मदनलाल धिंग्रा असो किंवा अनंत कान्हेरे ही सगळी मुलं तेव्हा सावरकरांच्या शब्दांसारखी पेटलेली होती. इतकं सगळं काम हा एकटा माणूस जिद्दीने करत होता. आपण जे ठरवलंय ते गाठण्यासाठी कधीही हरायचं नाही, कधी निराश व्हायचं नाही, सतत पॉझिटिव्ह राहायचं, अपयश आलं तर पुढची योजना तयार ठेवायची, हे सगळं हा माणूस केवढ्या तळमळीने करत होता. हल्ली एकाच वेळा या अशा अनेक गोष्टी शिकवण्याचे क्लासेस घेतले जातात म्हणे, मल्टीटास्किंग अशी गोड गोष्ट शिकून घ्यायला आमची पोरं गर्दीने क्लासला जातात. हे मल्टीटास्किंग तेव्हा सावरकरांनी प्रत्यक्ष करून दाखवल तेही परक्यांच्या देशात. आमच्या मुलांना या कहाण्या आम्ही सांगू लागलो तर तेही किती प्रेरित होतील अशाने, त्यांची मरगळ पळून जाईल क्षणात!

(हेही वाचा कारगिल युद्धाच्या विजयगाथा सांगताना परमवीरचक्र सन्मानित योगेंद्र सिंह यादव यांनी सांगितले थरारक अनुभव)

खूप खूप लांबचा विचार मोठी माणसं खूप आधी करतात. लंडनहून निघालेली बोट मार्सेला थांबेल आणि तिथून बाहेर पडलो आपण तर… ही जोखिम पत्करण्याची तयारी, त्याचं नियोजन होतं मनात. पकडलो गेलो तर अंदमानात भयानक कष्ट सोसावे लागतील हेही मनात पक्क होतं. मृत्यू जरी समोर उभा ठाकला तरी तू मला मारू शकत नाही, अनादी मी अनंत मी असं म्हणण्याची जिद्द होती. स्वतः वर असलेला विश्वास आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचा असतोच ना. आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर मी लढेन आणि मी जिंकेन असा सावरकरी बाणा आमच्या तरुण मित्रांनी मनात रुजवला तर अनेक प्रश्न निर्माण होण्याआधीच निकालात निघतील ना!

अंदमानातून सुटल्यावर त्यांचा सल्ला विचारायला मुलं येत सावरकरांकडे. मग ते मुलांना सांगत, कुणाच्या पायी चाकरी करण्यापेक्षा स्वतः उद्योगी व्हा, व्यवसाय सुरु करा, भांडवलासाठी मी मदत करतो! तेव्हा लेखण्या मोडा, बंदुका हाती घ्या असं म्हणून फार मोठी जोखीम पत्करली होती सावरकरांनी. आता तर लेखण्या मोडायाचीही आवश्यकता नाही आणि बंदुका चोरून लपून हाती घ्यायची गरज नाही. लेखण्या हाती घेऊन आता आपण देशाबद्दलचा चांगला विचार जगभर पोहोचवू शकतो आणि बंदुका हाती घेऊन भारताच्या सीमेवर शत्रूला धडकी भरवता येते.तरुण मित्रांनो, नोकरी मिळत नाही म्हणून मोर्चे काढायचे, भलती-सलती आंदोलनं करायची कशाला? मोर्चा, चर्चा किंवा नुसतीच पूजाअर्चा हा उपाय नाही त्यावर! त्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहून हवं ते करूया ना! सावरकर ज्याच्यासाठी झटले त्या स्वातंत्र्याने आम्हाला केवढं मोठं आकाश दिलं भराऱ्या मारायला, स्वतःच कर्तृत्व सिद्ध करायला!

तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा विनायक १४-१५ वर्षांचा कोवळा पोरगा होता, अष्टभुजेसमोर तो रडत होता, उसासत होता, त्याला प्रश्न सतावत होते, चापेकर देशासाठी कशाचीच पर्वा न करता फासावर गेले, आता त्याचं काम पुढे कोण करणार? कुणाची वाट कशाला बघायची, मीच का ते करू नये? युवकांची मनं तेव्हा खऱ्या अर्थाने उजळतील, युवा दिन सुफळ होईल, जेव्हा त्यांनाही वाटायला लागेल ? मी माझ्या देशासाठी करायला हवं काहीतरी? तरी जाणकारांसाठी एक प्रश्न उरतोच…! आपल्या भोवतालच्या पिढीला हे असे प्रश्न पडावेत, यासाठी आपण काही करतो का?

लेखक – पार्थ बावस्कर, इतिहास अभ्यासक आणि व्याख्याते. 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.