टिळक स्मारकाची कौलेही उडाली! साडेचार कोटी गेले कुठे?

106

भारत 75वा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पण, हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या क्रांतीकारकाने काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यांच्या स्मारकाची मात्र दुर्दशा झाली आहे.  शिवजयंती आणि गणेशोत्सव यांसारखे सार्वजनिक उत्सव सुरु करणारे, पारतंत्र्याच्या असंतोषाचे जनक असलेले लोकमान्य टिळक यांच्या रत्नागिरी येथील जन्मस्थानाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या संदर्भात हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली आहे. रत्नागिरीत ‘उर्दु भवन’च्या ऐवजी ‘लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रीय स्मारक’ उभारण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण प्रांत आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाडये यांनी पत्रकार परिषदेत केली. याविषयी हिंदू जनजागृती समिती मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत आंदोलन उभे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जन्मस्थानाची दुरवस्था

दुर्दैवाने भारतात गांधी-नेहरु आदी ठराविक व्यक्तिमत्त्वांचे उदात्तीकरण केले जाते, मात्र अन्य राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारकांची उपेक्षा होताना आढळते. टिळक जन्मस्थान राज्य शासनाच्या पुरातत्व विभाग, रत्नागिरीच्या अंतर्गत येते. या जन्मस्थानाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. लोकमान्य टिळकांच्या घरावरील छपराची कौले फुटली आहेत. भिंतींवर शेवाळ धरले असून, काही ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. एवढंच नाही, तर पुरातत्व खात्याने जन्मस्थानाच्या बाहेर लावलेला फलक गंजला असून, पुतळ्याचा रंगही काही ठिकाणी उडाला आहे. स्मारकाच्या छपराच्या कौलांवर गवत वाढले आहे. याकडे जर वेळीच लक्ष दिले नाही, तर पावसाळ्यात ही ऐतिहासिक वास्तू आणि वास्तूत जतन केलेला अनमोल ठेवा खराब होण्याची शक्यता आहे. मेघडंबरीच्या खांबांना लावलेल्या फरशांमध्ये भेगा पडल्या आहेत. मेघडंबरीवरील अर्धगोलाकार छताचा रंग उडाला आहे. मेघडंबरीच्या मागे लोकमान्य टिळकांची शिल्पाकृती तुटलेल्या स्थितीत आहे, असे खाडये यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हे दुर्दैव आहे

या स्मारकाला भेट द्यायला देशभरातून शेकडो पर्यटक, शाळांच्या सहली येतात. ते स्मारकाची माहिती पुस्तिका मागतात, मात्र स्मारकाच्या ठिकाणी साधी माहिती पुस्तिकाही नाही. पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सीसीटीव्ही नाही, वाहनतळाची व्यवस्था नाही. यांसारख्या अनेक गोष्टींचा इथे अभाव आहे. पर्यटकांना मोडलेले – तुटलेले आणि भग्नावस्थेतील जन्मस्थान पहावे लागत आहे, हे दुर्दैव आहे.

हिंदू जनजागृती समितीने केली ही मागणी

लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाचे त्वरित संरक्षण आणि संवर्धन करण्यात यावे. तसेच ते ‘राष्ट्रीय स्मारक‘ म्हणून घोषित करावे. येथे लोकमान्य टिळकांचा जीवनपट दाखवण्याची व्यवस्था करावी. जन्मस्थानाची माहिती पुस्तिका आणि लोकमान्यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या प्रती, लोकमान्य टिळकांची दुर्मिळ छायाचित्रे इत्यादी साहित्य येथे ठेवण्यात यावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

जनआंदोलन उभारणार

टिळक स्मारकाच्या झालेल्या दुर्दशेबाबत जनआंदोलन छेडण्यात येणार असून, ट्विटरपासून ते सर्व समाजमाध्यमांद्वारे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. हे आंदोलन मुंबई व पुणे येथेही होणार असल्याचे खाडये म्हणाले. सुशोभिकरणासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहिर केलेला साडेचार कोटींची निधी कुठे गेला, असा सवालही मनोज खाडये यांनी यावेळी केला. यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने जनआंदोलन उभे केले जाणार आहे, असे खाडये म्हणाले.

 (हेही वाचा :नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विशाखापट्टनम! काय आहेत वैशिष्ट्ये? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.