. . .तर मुंबईत कडक निर्बंध!

दरदिवशी आढळून येणाऱ्या रुग्णांनी तीन हजारांचा आकडा पार केल्यास, मुंबईत पुन्हा कडक निर्बंध लागू होण्याची दाट शक्यता आहे.

170

मुंबईमध्ये मार्चच्या पहिल्या दिवसापासून रुग्ण वाढीचा आलेख चढताच असून, दैनंदिन हजाराच्या आसपास असणाारी रुग्णसंख्या आता तीन हजाराच्या आसपास येऊन पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही धोक्याची सूचना आहे. त्यामुळे दरदिवशी आढळून येणाऱ्या रुग्णांनी तीन हजारांचा आकडा पार केल्यास, मुंबईत पुन्हा कडक निर्बंध लागू होण्याची दाट शक्यता आहे. सध्या महापालिकेची यंत्रणा त्या दृष्टीकोनातून विचार करत आहे. त्यामुळे तसे झाल्यास लोकल प्रवास जो सर्वसामान्य जनतेच्या ज्या ठराविक वेळेत खुला करुन दिला आहे, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करायला भाग पाडले जाऊ शकते. तसेच दुकान, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स आदींवर वेळेचे आणि ग्राहकांच्या संख्येचे बंधन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागरिकांचा निष्काळजीपणा जबाबदार

मुंबईमध्ये २८ फेब्रुवारी रोजी आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ही १०५० एवढी होती. पण १८ मार्च रोजी ही रुग्णसंख्या २ हजार ८७७ एवढी आढळून आली आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी रुग्ण वाढीचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, यामुळे महापालिकेच्या यंत्रणांच्या चिंतेत भर पडू लागली आहे. लसीकरणाची मोहीम सुरु असली तरी पहिल्या लसीनंतरही अनेकांना कोरोना झाल्याची उदाहरणे आहेत. बहुतांशी लोकांमध्ये कोरोनाची लस घेतल्यामुळे निष्काळजीपणा वाढत आहे. लस घेतल्यामुळे आपल्याला कोरोनाचा आजार होणार नाही, असाच त्यांचा समज आहे. पण दुसऱ्या लसीनंतरच याचा परिणाम दिसून येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगूनही, काही लोक निष्काळजीपणे वागत आहेत. कोरोनाच्या टास्क फोर्सने नेमून दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन आजही जनतेकडून कोटेकोरपणे होत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम रुग्णवाढीच्या माध्यमातून दिसून येत असल्याचे आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचाः मुंबईत वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे शेजारील शहरांच्या चिंतेत वाढ!)

आता पर्याय नाही

मुंबईमध्ये सध्या लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे, कोणत्याही प्रकारची काळजी स्वत: बाधित रुग्णही घेत नाही. ते घराबाहेर पडत असतात. त्याकरता महापालिका आयुक्तांनी कडक कारवाईचे निर्देश दिले असले, तरी रुग्णांकडून वारंवार याचे उल्लंघन होताना दिसत आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सध्या ज्याप्रकारे झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत आहे, ते पाहता आयुक्तांनी लग्न कार्यालये, सिनेमा गृह, अंत्ययात्रा आदींमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या उपस्थितीवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न केला. पण या निर्बधानंतरही रुग्णवाढीचे प्रमाण कायम आहे. दोन दिवसांमध्ये एक हजाराने रुग्ण संख्या वाढलेली आहे. ही अत्यंत चिंतेची बाब असून, आता यापूर्वी जे निर्बंध शिथिल करण्यात आले होते, ते निर्बंध आता कडक करण्याशिवाय पर्यायच नसल्याचे, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकलमध्ये प्रचंड गर्दी

रेल्वे लोकलमध्ये पुन्हा एकदा गर्दी होऊ लागली आहे. प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक तसेच सरकारी कर्मचारी वगळता खाजगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेत रेल्वे प्रवास खुला केला. पण प्रत्यक्षात याचे पालन होत नसून लोकलमध्ये पुन्हा एकदा खचाखच गर्दी होऊ लागली आहे. लोकलमध्ये मास्क लावण्याचे प्रमाण दिसून येत असले तरी काही माणसे याचे पालन करत नाही. याचा परिणाम अन्य प्रवाशांवर होऊ शकतो. त्यामुळे शासनाने लोकल प्रवासाबाबत जारी केलेल्या परिपत्रकानुसार, योग्यप्रकारे अंमलबजावणी होते किंवा नाही हे तपासून नेमून दिलेल्या वेळेत प्रवास करण्याची मुभा देण्याकरता आता कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

(हेही वाचाः धारावीत पुन्हा जून, सप्टेंबरचा प्लॅशबॅक!)

पुन्हा परिस्थितीत हाताबाहेर जाईल

रेल्वे स्थानक परिसर, गर्दीची ठिकाणे म्हणजेच भाजी मार्केट, समुद्र किनारपट्टी आदींकरताही वेळेचे बंधन लागू करण्याची गरज भासणार आहे. अर्थात हे सर्व तीन हजारांच्यावर रुग्ण संख्या पोहोचल्यानंतर करणे योग्य ठरेल. पण ज्याप्रकारे रुग्णसंख्या वाढत आहे हे पाहता प्रशासनाला अधिक वेळ आता घालवता येणार नाही. कारण सर्वच विचार केल्यास पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशीही भीती त्यांनी वर्तवली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.