‘गेट वे ऑफ इंडिया’वर कार्यक्रमांसाठी मोजावे लागणार इतके पैसे

106

मुंबई शहराचे मानचिन्ह असलेले गेट वे ऑफ इंडिया हे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे ‘अ’ गटात असलेले राज्य संरक्षित स्मारक आहे. या स्मारकाच्या परिसरात शासकीय विभाग, खाजगी आणि गैरशासकीय संस्था यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमाकरिता पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नियमावली आणि शुल्क निर्धारण निश्चित करण्यात आले आहे.

( हेही वाचा : बेरोजगारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! मिळेल भरगच्च पगार, या ठिकाणी करा अर्ज! )

भारतीय सेना दल, हवाई दल आणि नौदल, पोलीस आणि निमलष्करी दलाच्या कार्यक्रमांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. शासकीय विभागाचा कार्यक्रम असल्यास प्रत्येक दिवशी कार्यक्रमासाठी ५० हजार रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस १० हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. अव्यावसायिक/स्वयंसेवी संस्था, तसेच धर्मादाय संस्थेने कार्यक्रम आयोजित केल्यास प्रत्येक दिवशी १ लाख रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस ५० हजार रुपये शुल्क आकारले जाईल. व्यावसायिक कार्यक्रम व्यवस्थापन संस्थेने कार्यक्रम आयोजित केल्यास प्रत्येक दिवशी ५ लाख रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस १ लाख रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. विदेशी दुतावासामार्फत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमासाठी १ लाख रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस १० हजार रुपये शुल्क आकारले जाईल.

कोणाकडून किती पैसे घेणार?

शासकीय विभाग आणि धर्मादाय संस्था/स्वयंसेवी/सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केला असल्यास १ लाख रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस १० हजार रुपये, शासकीय विभाग आणि व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केला असल्यास २ लाख रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस १ लाख रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. विदेशी दुतावास आणि व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केला असल्यास २ लाख रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस १ लाख रुपये शुल्क आकारले जाईल

परवानगी कोण देणार?

सांस्कृतिक कार्य विभागाच्या मान्यतेने पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालकांनी परवानगी जारी केल्यानंतरच मुंबई पोर्ट ट्रस्ट, सहायक आयुक्त प्रशासन, कुलाब्यातील वाहतूक पोलीस मुख्यालय, भायखळ्याच्या मुंबई फायर बिग्रेडचे उपमुख्य अधिकारी आणि मुंबई पालिकेच्या ए वार्डचे अधिकारी यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे आवश्यक असून, ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील.

आयत्यावेळी परवानगी मागितल्यास अतिरिक्त शुल्क

कार्यक्रमाच्या नियोजित तारखेच्या कमीत कमी २१ दिवस आधी अर्ज संचालनालयास प्राप्त होणे आवश्यक आहे. अर्ज उशीरा प्राप्त होऊन नियोजित तारीख उपलब्ध असल्यास १ लाख रुपये जलद शुल्क आवेदकांना भरावे लागेल. शासकीय आस्थापनांचे आणि दुतावासांचे अर्ज १५ दिवस आधी संचालनालयास प्राप्त होणे आवश्यक आहे. जाहिराती व व्यावसायिक प्रसिद्धीसाठी गेट वे ऑफ इंडियाचे छायाचित्र किंवा चिन्ह वापरणे हे व्यावसायिक चित्रीकरण समजले जाईल. पूर्व परवानगी आणि १ लाख स्वामित्वधन न भरता असे छायाचित्र किंवा चिन्ह वापरले गेल्यास दंडात्मक कार्यवाही केली जाईल. कोणताही धार्मिक विधी, राजकीय स्वरुपाचे कार्यक्रम अथवा विवाह सोहळे यासाठी सदर स्मारकाचा वापर करता येणार नाही. स्मारक परिसरात सोमवार ते शुक्रवार या दिवशी कार्यक्रमास परवानगी देण्यात येईल. शासकीय कार्यक्रम वगळता इतर कुठल्याही कार्यक्रमास शनिवार आणि रविवार या दिवसांकरिता परवानगी देण्यात येणार नाही, स्मारक परिसर फक्त पर्यटकांकरिता खुले असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.