भारताच्या किनारपट्टी भागांतील पाणथळ जमिनींना भेट देणारे फ्लेमिंगो पक्षी सर्वांचेच आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. गुलाबी रंगाची झालर देणा-या या स्थलांतरित पक्ष्यांच्या भ्रमणमार्गाचे रहस्य उलगडण्यासाठी मुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी(बीएनएचएस)ने सॅटलाईट टॅगिंग केलेल्या सहा फ्लेमिंगो पक्ष्यांना आता स्वतःची ओळख मिळाली आहे. मुंबई व नवी मुंबई परिसरातील सहा फ्लेमिंगो आता खेनगर्जी ३, लेस्टर, मॅककॅन, सलीम, हुमायून आणि नवी मुंबई या नावाने लवकरच आकाशात उंच भरारी मारत मुंबई व नवी मुंबईच्या किनारपट्टीला अलविदा करणार आहेत.
९० दशकाच्या सुरुवातीला सुरुवातीला शिवडीत पहिल्यांदा फ्लेमिंगो पक्षी आढळला होता. नजीकच्या पाणथळ जमिनीतील अल्गे शेवाळ खाऊन हे पक्षी पावसाळ्यापर्यंत आढळून येतात. अल्गे शेवाळ खाल्ल्याने सुरुवातीला करड्या रंगात आढळणारे फ्लेमिंगो कालांतराने गुलाबी रंगाचे होतात. ही गुलाबी रंगाची झालर शिवडीपासून ते ठाणे खाडी, नवी मुंबईतील पणजे, नॉन इंडियन संकुल, ट्रेनिंग शीप चाणाक्य या परिसरांत पाहायला पक्षीप्रेमींची अफाट गर्दी उफाळते. या पक्ष्यांना पावसाळा नकोसा वाटतो. म्हणूनच पावसाळा गेल्यानंतर फ्लेमिंगो पाणथळ भागांत पुन्हा परततात. परंतु आताही फ्लेमिंगो पक्षी नेमक्या कोणत्या भागांतून परततात, हे गूढ सुटलेले नाही. लेसर आणि ग्रेटर या दोन प्रमुख फ्लेमिंगो पक्ष्यांच्या प्रजाती मुंबई व नवी मुंबईच्या किना-यावर दिसून येतात. या पक्ष्यांच्या भ्रमणमार्गाचा उलगडा होण्यासाठी जानेवारी ते एप्रिल महिन्यादरम्यान बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांनी तीन ग्रेटर फ्लेमिंगो आणि तीन लेसर फ्लेमिंगो पक्ष्यांना सॅटलाईट टॅग केले. यात लहान ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगो पिल्लांचाही समावेश आहे. सहा सॅटलाईट टॅगिंग प्रकल्पासाठी तब्बल अठरा लाखांचा खर्च आल्याची माहिती बीएनएचएसचे संचालक डॉ बिवाश पांड्या यांनी दिली.
सहा फ्लेमिंगो पक्ष्यांच्या नावामागील रंजक कहाण्या जाणून घ्या…
खेनगर्जी ३ –
भांडूप पम्पिंग स्टेशन येथून सॅटलाईट टॅग केलेल्या ग्रेटर फ्लेमिंगोला खेनगर्जी ३ असे नाव दिले गेले. १८६६ साली जन्मलेल्या कच्छ येथील महाराजा महाधिराजा मिर्झा राव श्री खेनगर्जी ३ साहीब बहादूर राव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पहिल्या वहिल्या सॅटलाईट टॅगिंगचा मान मिळालेल्या ग्रेटर फ्लेमिंगो खेनगर्जी ३ या नावाने ओळखला जाणार आहे. . खेनगर्जी ३ यांनीच भारतात ग्रेटल फ्लेमिंगोचे प्रजनन होत असल्याचा शोध घेतला होता.
लेस्टर –
गुजरात राज्यातील कच्छ येथील पाणथळ जमिनीला भेट देणा-या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या लिखाणात पक्षीशास्त्रज्ञ कॅप्टन सी.डी. लेस्टर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना कच्छमधील फ्लेमिंगो पक्ष्यासह इतर पक्ष्यांबाबतही १९ व २०व्या दशकाच्या सुरुवातीला भरपूर लिखाण केले. ट्रेनिंग शीप चाणाक्य येथून दुसरा सॅटलाईट टॅग केलेला ग्रेटर फ्लेमिगोला नाव देताना बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांनी लेस्टर यांच्या भरीव योगदानासाठी या फ्लेमिंगोला लेस्टर असे नाव दिले.
मॅकॅन –
भांडूप पम्पिंग स्टेशन येथून तिसरा ग्रेटर फ्लेमिंगो सॅटलाईट टॅगिंगसाठी निवडला गेला. ग्रेटर फ्लेमिंगोच्या या पिल्लाला मॅकॅन असे नाव दिले गेले. भारतातील जैवविविधतेबाबत तब्बल २०० लेख लिहिणा-या मॅककॅन या निसर्गतज्ज्ञाचे नाव ग्रेटर फ्लेमिंगोचे पिल्लू जगभरात पोहोचवणार आहे. १९३९ साली मॅकॅन यांनी कच्छच्या पाणथळ जमिनीला भेट देणा-या फ्लेमिंगो पक्ष्याबाबत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीसाठी शोधनिबंधही लिहिला होता.
सलीम –
भारताचे प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ आणि बीएनएचएसचे सर्वेसर्वा डॉ सलीम अली यांनी कच्छमधील लेसर फ्लेमिंगो प्रजननासाठी येत असल्याची सखोल माहिती जगाला दिली. १९४० ते १९७० या तीस वर्षांच्या काळात त्यांनी याबाबतीत भरीव लिखाण केले. त्यामुळे चौथ्यांदा सॅटलाईट टॅगिंग झालेल्या एका लेसर फ्लेमिंगोला सलीम असे नाव दिले गेले. हा पक्षी ट्रेनिंग शीप चाणाक्य येथून सॅटलाईट टॅग केला गेला.
हुमायून –
डॉ सलीम अली यांच्यासह पक्षीसंशोधनात मोलाटा वाटा उचलणारे पक्षीतज्ज्ञ हुमायून अब्दुलली यांच्या सन्मानार्थ पाचवे सॅटलाईट टॅगिंग झालेल्या लेसर फ्लेमिंगोला हुमायुन हे नाव मिळाले. हुमायून यांनी मुंबईतील पक्षीवैभवाबाबत बरेच संशोधन केले. हुमायुनला ट्रेनिंग शीप चाणाक्य येथून सॅटलाईट टॅगिंग केले गेले.
नवी मुंबई –
फ्लेमिंगो पक्ष्यांचे शहर अशी ओळख निर्माण झालेल्या नवी मुंबई शहराच्या सन्मासाठी शेवटचा सहावा फ्लेमिंगो जगभरात आता नवी मुंबई या नावाने ओळखला जाईल. नवी मुंबईतील ऐरोलीत फ्लेमिंगोंच्या दर्शनासाठी ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य उभारले गेले आहे. नवी मुंबईतील ट्रेनिंग शीप चाणाक्य येथूनच लेसर फ्लेमिंगो पक्ष्याच्या पिल्लाचा शेवटचे सॅटलाईट टॅगिंग केल गेले.