पावसाळ्यात पाण्याखाली जाणारी मुंबईतील पोलीस ठाणी

135
पावसाळ्यात मुंबईची तुंबई होण्यापासून वाचवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून उपाययोजना करण्यात येतात. मात्र मुंबईतील पोलीस ठाणी पावसाळ्यात पाण्याखाली जातात. त्याच्यावर अद्याप कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. मुंबईतील सुमारे १८ पोलीस ठाण्यात प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचून पोलीस ठाण्याचे संपूर्ण काम ठप्प होत असल्यामुळे पोलिसांसह तक्रारदारांना गैरसोय होते.
मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यांपैकी १८ पोलीस ठाणी पाण्याखाली जातात. प्रत्येक वर्षी या १८ पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्ष, अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गुडघाभर पाणी भरल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट उडते. पोलीस ठाण्यातील पाणी काढायचे, पोलीस ठाण्यातील कागदपत्रे वाचवायची त्याच सोबत तक्रारदार यांची गाऱ्हाणी लिहून घ्यायची, असा प्रश्न यावेळी पोलिसांना पडतो. हे सर्व करताना पोलिसांची दमछाक झालेली असते.

साकीनाका पोलीस ठाणे

साकीनाका पोलीस ठाण्यात प्रत्येकवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचून पोलीस ठाण्याचे काम ठप्प होते. तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की प्राथमिक उपाय म्हणून आम्ही एफआयआर, ठाणे अंमलदार नोंदवही आणि अदखलपात्र गुन्हा पुस्तकासह सर्व महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितस्थळी हलवतो. गस्तीवर असणारे अंमलदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून आम्ही शक्य तितक्या गोष्टी पहिल्या मजल्यावर सुरक्षित आणून ठेवतो. प्रत्येक वर्षी आम्ही पावसाळ्यात या गोष्टीची काळजी घेत असल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.

नेहरू नगर पोलीस ठाणे 

प्रत्येक पावसाळ्यात, नेहरू नगर पोलीस ठाणे हे पाण्याखाली जाते. त्याचे कारण म्हणजे पोलीस ठाण्याच्या मागे असलेला नाला  तसेच वत्सलबाई नाईकनगर जवळील मोठा नाला मुसळधार पावसाळ्यात पूर्णपणे भरून नाल्याचे पाणी तसेच नेहरु नगर पोलीस वसाहत आणि पोलीस ठाणे सखोल भागात असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे नाल्याचे आणि पावसाचे पाणी पोलीस ठाण्यात साचते. पोलीस ठाण्यातील सर्वच खोल्यांमध्ये कमरेएवढे पाणी साचते. पोलीस ठाण्याला मजला नसल्यामुळे पोलीस ठाण्याचे महत्वाचे कागदपत्रे, केसपेपर, खटल्याचे कागदपत्रे ठेवण्यासाठी शेजारच्या इमारतीचा अथवा टेबलावर टेबल ठेवून त्याचा आसरा घ्यावा लागत असल्याचे, नेहरू नगर पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी सांगितले. महत्त्वाचे कॉल्स अटेंड करण्यासाठी काही अधिकारी अंमलदार यांना  स्टेशन हाऊसवर ड्युटी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना टेबलवर बसून पोलीस ठाण्यातील काम पहावे लागते असेही अधिका-यांनी सांगितले.

भायखळा पोलीस स्टेशन

भायखळा पोलीस ठाण्याची गेल्यावर्षीपासून पावसाच्या पाण्यातून सुटका झाली आहे. महानगरपालिकेने पोलीस ठाण्याच्या आत अतिरिक्त ड्रेनेज सिस्टम बसवल्यामुळे गेल्यावर्षीपासून भायखळा पोलीस ठाण्यात पावसाच्या पाण्याचा निचरा होत असून येथील पाणी साचण्याची समस्या दूर झाली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत यांनी सांगितले.
वाकोला पोलीस ठाणे पश्चिम द्रुतगती महामार्गाला खेटून आहे. पोलीस ठाण्याचा भाग सखोल असल्यामुळे महामार्गाचे पाणी तसेच कुर्ला कलिना रोडचे पाणी प्रत्येक पावसाळ्यात पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन संपूर्ण पोलीस ठाणे पाण्याखाली जाते. जिथे पाणी साचते तेथील सर्व महत्त्वाची कागदपत्रे उंच ठिकाणी अथवा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर  ठेवली जातात, असे पोलीस अधिका-याने सांगितले, “आम्हाला प्रत्येक वर्षी पावसाळ्यात याचा सामना करावा लागतो, असे अधिकारी-यांनी सांगितले.

हे आहेत मुंबईतील पाणी भरणारे पोलीस ठाणे

पूर्व प्रादेशिक विभाग 
१) नेहरू नगर, २)चुनाभट्टी ३) टिळक नगर ४)पंतनगर,५)पार्कसाईड ६) कांजूरमार्ग ७)नवघर ८) गोवंडी
मध्य प्रादेशिक विभाग 
१) विनोबा भावे नगर २) सायन ३) माटुंगा ४) वडाळा टिटी ५)वडाळा६) शिवडी
पश्चिम प्रादेशिक विभाग 
१) साकिनाका २) वाकोला ३) खेरवाडी आणि उत्तर प्रादेशिक विभागातील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे
 ️
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.