संपूर्ण देशात सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईनला उभे राहून कोरोनाशी सामना करणाऱ्या कोरोना योद्धांना लस देण्यात आली. ज्यात डॉक्टर, आरोग्य विभागातील कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता, आता राज्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला, ज्यात वयस्क आणि अनेक आजार जडलेल्यांना लस दिली जात आहे. असे असताना कोरोना काळात आणि आताही पोलीस तसेच आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे महाराष्ट्र सुरक्षा दला ( एमएसएफ) तील जवान आणि ट्रॅफिक वॉर्डन यांचा सरकारला विसरला पडला आहे. त्यांना कोरोनाच्या लसीपासून सरकारने अद्याप वंचित ठेवल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे.
कोरोनामुळे २ एमएसएफच्या जवानांचा मृत्यू!
६/११च्या दहशदवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. या दलात अधिकतर जवान पोलीस भरतीत थोड्या कारणासाठी नापास झालेले जवान आहेत. ज्यांना पोलीस दलात संधी मिळाली नाही, अशा तरुणांना महाराष्ट्र् सुरक्षा दलात सामील करून घेतले आहे. या जवानांना रुग्णालय, रेल्वे, मेट्रो, विमानतळ आदी ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे. एकट्या मुंबईत एक हजारापेक्षा जास्त एमएसएफचे जवान सरकारी रुग्णालय, रेल्वे, मेट्रो आदी महत्वाच्या ठिकाणी तैनात आहेत. तसेच ७५० ट्रॅफिक वॉर्डन मुंबईतील रस्त्यावर वाहतूक पोलिसांसोबत वाहतूक नियंत्रण करीत असतात. ज्या वेळी राज्यभरात कोरोनाचा उद्रेक झाला, तेव्हा हे जवान आणि ट्रॅफिक वॉर्डन आपला जीव धोक्यात घालून पोलीस तसेच आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून कोरोना या अदृश्य शत्रूशी सामना करीत होते. कोरोना संसर्ग वाढला त्या वेळी एमएसएफचे अनेक जवान तसेच ट्रॅफिक वॉर्डन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात दोन एमएसएफच्या जवानांचा मृत्यू देखील झाला होता. मात्र पोलीस अथवा इतर आस्थापनाप्रमाणे त्यांना कुठल्याही प्रकाराची सुविधा अथवा वैद्यकीय सुविधा मिळाली नसल्याचा आरोप एमएसएफच्या एका जवानाने केला आहे.
(हेही वाचा : डिजिटल इंडियात विनामास्क दंड वसुली मात्र तेही रोखीत! )
सरकारने डावलल्याचा आरोप!
विशेष पोलीस अधिकारी म्हणून आम्हाला पदे दिले गेली आहे, मात्र पोलिसांना मिळतो त्यापैकी कुठलाही लाभ आम्हाला देण्यात आलेला नाही. पोलिसांसाठी लसीकरण सुरु झाले त्यावेळी आम्हाला देखील लस उपलब्ध होईल, असे वाटले होते. मात्र आम्हाला त्यातून डावलून सामान्य नागरिकांच्या रांगेत आणून बसवले आहे, असा आरोप मेट्रो रेल्वे येथे सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असलेल्या जवानाने म्हटले आहे. कोरोनाच्या काळात आम्ही जीवाची पर्वा न करता वाहतूक नियंत्रण करीत होतो, त्यातून अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला त्यातही आम्ही काम केले, मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा पुरवली गेली नाही, असे घाटकोपर छेडा नगर या ठिकाणी तैनात असलेल्या ३८ वर्षीय ट्रॅफिक वॉर्डनचे म्हणणे आहे.