राज्याच्या किनारपट्टीला भेट देणा-या ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटलाईट टॅगिंग करुन त्यांची समुद्रभ्रमंती जाणून घेण्याच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना सातत्याने ग्रहण लागत आहे. नवी मुंबईच्या समुद्रकिना-याला भेट दिलेल्या ‘सावनी’ या मादी ऑलिव्ह रिडले कासवाचा संपर्क तुटल्याची बातमी वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडून दिली गेली. गेल्या सहा महिन्यांत पाचपैकी तीन ऑलिव्ह रिडले कासवांचा संपर्क तुटल्याने, आता केवळ दोन ऑलिव्ह रिडले मादी कासवांवरच सर्व्हेक्षणाचा भार पडला आहे.
५ जूनपासून सिग्नल मिळणे बंद
फेब्रुवारी महिन्यात सॅटलाईट टॅगिंग झालेली ‘लक्ष्मी’ ही ऑलिव्ह रिडले मादी महिन्याभरातच संपर्काच्याबाहेर गेली. सिग्नल मिळण्यास तांत्रिक बिघाड किंवा कासवाचा मृत्यू या दोन शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केल्या होत्या. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस तिच्या पाठीवर बसवलेले ट्रान्समीटर बंद करण्याचा निर्णय शास्त्रज्ञांनी घेतला. मे महिन्याच्या अखेरीस ‘प्रथमा’ या पहिल्या सॅटलाईट टॅगिंग केलेल्या ऑलिव्ह रिडले मादीकडून संपर्क मिळणे बंद झाले. त्यावेळी ट्रान्समीटरवरील तांत्रिक बिघाडाची शास्त्रज्ञांनी शक्यता व्यक्त केली. ५ जून रोजी जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना, ‘सावनी’ या ऑलिव्ह रिडले मादी कासवाकडून ट्रान्समीटरच्या माध्यमातून सिग्नल मिळणे बंद झाले. २३ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस कांदळवन कक्षानकडून सावनीदेखील गायब झाल्याची कबुली दिली गेली. सावनी शेवटची कर्नाटक राज्यातील कुमटा या समुद्रकिना-यापासून १०० किलोमीटर आत समुद्रात संचार करत होती. सॅटलाईट टॅगिंग केल्यापासून सावनीने आतापर्यंत १ हजार ९६० किलोमीटर अंतर पार केले आहे.
आता केवळ वनश्री आणि रेवा संपर्कात
तीन ऑलिव्ह रिडले मादी कासवांचा संपर्क तुटल्यानंतर, आता केवळ वनश्री आणि रेवा या ऑलिव्ह रिडले मादींकडून मिळणा-या टान्समीटर संपर्कातून वर्षाअखेरीपर्यंत सर्व्हेक्षणाच्या महत्त्वाचा टप्पा उलगडू शकतो, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community