भारतात आढळणा-या पक्ष्यांच्या पायाला रिंग टॅग करुन त्यांचा भ्रमंतीमार्ग शोधणाऱ्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या पर्यावरणप्रेमी संस्थेने ओडिशा राज्यातील पक्ष्याला चीनमधून शोधले आहे. या पक्ष्यांच्या दोन्ही पायावरील रिंग टॅगिंगची माहिती एका छायाचित्रकाराने पाहिली. या छायाचित्रकाराकडूनच बीएनएचएसला संपर्क साधला गेला. भारतात सर्वत्र आढळणारा शेकाट्या हा पक्षी चीनमध्येही दिसून येत असल्याची माहिती या रिंग टॅगिंगमधून समोर आल्याची माहिती बीएनएचएसचे संचालक डॉ. बिवाश पांड्या यांनी दिली.
( हेही वाचा : दहावी, बारावी निकालाच्या तारखा जाहीर )
रिंग टॅग करुन त्यांचा भ्रमणमार्ग शोधणारी देशातील एकमेव संस्था
शेकाट्या हा पक्षी भारतात सर्वत्र आढळतो. हा पक्षी मुख्यत्वे समुद्र किना-यावर किंवा खाजण जमिनीवर आढळतो. या पक्ष्यांचे प्रजनन भारतात होते, त्यामुळे शेकाट्या हा स्थानिक पक्षी असल्याची समजूत आहे. परंतु काही पक्षी स्थलांतर करतात. त्यामुळे त्यांचा भ्रमणमार्ग जाणून घेण्यासाठी ओडिशा राज्यातून २०१७ साली शेकाट्या या पक्ष्याला बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांनी रिंग टॅग केले होते. हा पक्षी चीनमधील झीनजँग येथील उलुंगुर तलाव परिसरात दिसून आला. दोन दिवसांपूर्वी संबंधित छायाचित्रकाराने आम्हांला मेलद्वारे संपर्क साधून ही माहिती दिली, असेही डॉ. पांड्या म्हणाले.
पक्ष्यांच्या पायाला रिंग टॅग करुन त्यांचा भ्रमणमार्ग शोधणारी देशातील एकमेव बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही नो़डल संस्था आहे. पक्ष्यांच्या दोन्ही पायाला टॅगिंगची माहिती दिली जाते. एका पायावर मेटलला विशेष नंबर असतो. दुस-या पायावर प्रत्येक देशासाठीचा राखीव रंगातील झेंडा आणि त्याचा राखीव क्रमांक असतो. भारतातील उत्तरेकडील पक्ष्यांसाठी व झेंड्यासाठी पांढरा रंग आणि लाल अक्षरात क्रमांक लिहिला जातो. दक्षिणेकडील पक्ष्यांच्या झेंड्यावर काळा रंग आणि विशेष पांढ-या रंगात क्रमांक लिहिला जातो. ही माहिती मिळताच पक्षीप्रेमी बीएनएचएसच्या सोशल मिडीया किंवा ईमेलवर संपर्क साधतात.
जगभरात रिंग टॅग केलेल्या कोणत्याही पक्ष्याबाबत आम्हांला माहिती मिळाली तरीही आम्ही संबंधित देशांना ही माहिती देऊ. हा प्रकल्प पक्ष्यांच्या भ्रमणमार्गाची माहिती व अभ्यासासाठी आहे.
– डॉ बिवाश पांड्या, संचालक, बीएनएचएस
शेकाट्याविषयी
२५ सेमी आकाराचा शेकाट्या पक्षी हा काळ्या आणि पांढ-या रंगात पाहायला मिळतो. लांब पाय, सडपातळ शरीरयष्टी, लाल रंगाची सडपातळ चोच असणारा हा पक्षी खाजण जमिनीवर किंवा समुद्रकिना-यावर दिसतो. हा पक्षी बांगलादेश आणि श्रीलंकेतही आढळतो.