कासवप्रेमी सुखावले, ‘या’ दुर्मिळ कासवाचे दर्शन

जगभरातील सर्वात मोठी कासवाची प्रजाती म्हणून ओळखल्या जाणा-या लेदरबॅक या दुर्मिळ कासवाने नुकतीच राज्याच्या दक्षिण कोकण किनारपट्टीला भेट देत कासवप्रेमींना सुखाचा धक्का दिला. साधारणतः ५ ते ७ फूटांचा हा कासव मच्छिमारांच्या जाळ्यात चुकून अडकला. मच्छिमारांनी तातडीने जाळे कापून या सागरीजीवाला समुद्रात पुन्हा सोडले. जाळे कापून कासवाला जीवनदान दिल्याने नुकसानभरपाईसाठी या कासवाचे छायाचित्र संबंधित मच्छिमाराने घेतल्यानंतर या कासवाच्या दुर्मिळ दर्शनाचा उलगडा झाला. या घटनेसह गेल्या चार वर्षांत सलग दोन घटनांमध्ये उन्हाळ्यातच हे दुर्मिळ कासव दिसून येत असल्याचा ठाम निष्कर्ष सागरी जीवशास्त्रज्ञांनी मांडला.

वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे लॅदरबॅक कासवाच्या नोंदीनुसार नुकत्याच झालेल्या कोकणातील लॅदरबॅक दर्शनानंतर आतापर्यंत केवळ चारवेळाच हा दुर्मिळ कासव किनारपट्टीजवळ आढळला आहे. २८ मे रोजी लेदरबॅक कासव दक्षिण कोकणातील लेदरबॅक किनारी भागांतील तेरेखोल खाडीतील मासेमारीदरम्यान जाळ्यात अडकले होते. या कासवाचे छायाचित्र रुपेश म्हाकले या मस्त्य विभागातील अधिका-याने आपल्या टीमच्या मदतीने कांदळवन कक्षाकडे पाठवले. कासवाचे छायाचित्र पाहिल्यानंतर कांदळवन कक्षातील अधिका-यांना याबाबतचा उलगडा झाला. वनविभागाने कांदळवन कक्षाची स्थापना केल्यानंतर मत्स्य विभागासह २०१८ सालापासून मच्छिमारांसाठी नुकसान भरपाईची योजना सुरु केली. या योजनेंतर्गत मच्छिमारांना आर्थिक मदत पुरवली जाते. योजनेच्या चार वर्षांच्या काळात आतापर्यंत तीनवेळा लॅदरबॅक कासवाचे राज्याच्या किना-यालगतच्या समुद्रात दर्शन झाल्याची माहिती कांदळवन कक्षाकडून दिली गेली.

लॅदरबॅक कासवाबाबत –

  • साधारणतः ५ ते ७ फूटांच्या आकाराचे लॅदरबॅक कासव जगातील सर्वात मोठी कासवांची प्रजात म्हणून गणली जाते
  • लेदरबॅक कासव हे मुख्यतः अंदमान व निकोबार बेटांवरील किना-यावर घरटी तयार करतात
  • जेलीफिश हे लेदरबॅक कासवाचे प्रमुख अन्न आहे. जेलीफिशसाठी लेदरबॅक कासव समुद्रात लांब अंतराचा प्रवासही करतात
  • भारतीय वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ नुसार, लेदरबॅक कासवाला पहिल्या वर्गवारीत संरक्षण दिले आहे. या कासवाची शिकार किंवा तस्करीचे प्रकरण आढळल्यास आरोपीला सात वर्ष सक्त तुरुंगवास तसेच आर्थिक दंडाची योजना आहे.
  • आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या यादीत लेदरबॅक हे कासव जगभरात असुरक्षित म्हणून जाहीर केले आहे.

लॅदरबॅक कासवाची राज्यातील किनारपट्टीवरील नोंद –

  • १९८५ – केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेच्या नोंदीत मालवण किना-यावरील देवबाग येथे साडेचार फूटांचा लेदरबॅक कासव आढळला
  • २०१९ – १९८५ सालानंतर तब्बल ३४ वर्षानंतर मे २०१९ रोजी रायगड जिल्ह्यातील भरडखोल येथे लेदरबॅक कासवाच्या दर्शनाची नोंद झाली. कांदळवन कक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच लेदरबॅक कासवाच्या दर्शनाचा रेकॉर्ड झाला.
  • २०२१ – मार्च २०२१ रोजी उत्तर कोकणातील डहाणू येथील नारपाडा भागांतून या दुर्मिळ कासवाच्या प्रजातीची नोंद झाली.
  • २०२२- २८ मे रोजी वेंगुर्ल्यातील तेरेखोल खाडीसमोर अंदाजे २३ ते २४ मीटर खोल पाण्यात लेदरबॅक कासव मासेमारीच्या जाळ्यात अडकल्याने सापडला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here