इस्त्राईल देशातून येणाऱ्या झेब्राच्या आगमनाला परराष्ट्र व्यापार मंत्रालयाने लाल कंदील दाखवला आहे. परिणामी झेब्राच्या मोबदल्यात गुजरातहून राणीबागेत येणा-या सिंहांनाही ग्रहण लागले आहे. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह मिळण्यासाठी उन्हाळ्यातच गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयाला भेट देत सिंह देण्याची विनंती केली. त्या मोबदल्यात एका वाघाच्या जोडीची देवाणघेवाण ठरली. त्यापुढे अजूनही फारशी सकारात्मक चिन्हे दिसून आलेली नाहीत. इस्त्राईल देशात आफ्रिकन होर्स सिकनेस नावाचा आजार प्राण्यांमध्ये पसरला आहे. या आजाराचा प्रसार देशात होऊ नये म्हणून परराष्ट्र व्यापार मंत्रालयाने झेब्रा आणण्याची परवानगी नाकारली आहे. दोन झेब्रांच्या जोड्यांच्या मोबदल्यात राणीबागेला गुजरातहून दोन सिंहाची जोडी मिळणार आहे.
( हेही वाचा : गोरेगावात बेस्ट बसचा अपघात; पाच जण जखमी )
गेल्या वर्षी गोरखपूर, लखनऊ, कानपूर येथील प्राणिसंग्रहालयात इस्त्राईल देशातून झेब्राचे आगमन झाले होते. यंदाच्या वर्षात राणीबागेत झेब्रा आणताना आफ्रिकन होर्स सिकनेस आजाराचे कारण दिले जात असल्याने इतर देशांतून झेब्रा आणण्याचाही राणीबाग प्रशासनाने विचार केला. विमानातून प्रवासाची वेळ पाहता अमेरिका किंवा इतर देशांतून झेब्रा भारतात आणणे जिकरीचे ठरणार आहे. इस्त्राईल देशानेही या आजाराचा प्रसार भारतात होणार नाही, असे हमीपत्र परराष्ट्र व्यापार मंत्रालयाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रीय उद्यानात केवळ दोनच सिंह
बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जेस्पा आणि रवींद्र हे दोन नर सिंह आहेत. त्यापैकी रवींद्र (१७) आर्थरायटीस या संधिवाताच्या आजाराने कायम जमिनीवरच पडून असतो. वृद्धापकाळाकडे झुकलेल्या रवींद्रची कधीही प्राणज्योत मालवेल, अशी भीती आहे. जेस्पाही ११ वर्षांचा आहे. जेस्पाचेही वय पाहता तो मिलनासाठी आता योग्य राहिलेला नाही. उद्यानाला एका सिंहाच्या जोडीची तातडीची गरज आहे. अन्यथा सिंह सफारीत काही कालावधीनंतर सिंहच दिसणार नाही, अशी परिस्थिती आहे.
काय आहे आफ्रिकन होर्स सिकनेस
आफ्रिकन होर्स सिकनेस विषाणूमुळे हा आफ्रिकन होर्स सिकनेस आजार प्राण्यांना होतो. हा रोग कीटक वाहकांमुळे पसरतो. हा रोग क्युलेक्स, अॅनोफिलीस आणि एडीज यांसारख्या डासांच्या प्रजातींद्वारे देखील प्रसारित केला जाऊ शकतो. कित्येकदा या रोगाच्या प्रसारामुळे प्राण्यांचा मृत्यू होतो.
Join Our WhatsApp Community