मेट्रोच्या कचऱ्याचा अनधिकृत भराव कांजूरच्या डंम्पिग ग्राऊंडवर

163

महानगरपालिकेच्या कांजूरमार्ग येथील डंम्पिग ग्राऊंडवर मेट्रो ३ आणि ६च्या कामाचा कचरा अनधिकृतपणे टाकला जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी संस्थेचे प्रकल्प संचालक  स्टॅलिन डी यांनी केला आहे. या कामाची माती श्रीवर्धनला घेऊन जाण्याचे नियोजित होते. मात्र एकही ट्रक तिथे नेलेला नाही. हा सर्व कचरा कांजूर मार्ग येथे टाकला जात असल्याचे  स्टॅलिन डी. यांनी सांगितले.

कांजूरमार्ग येथे कचऱ्यासह बांधकामातून बाहेर काढलेली माती आणि डेब्रिज सर्रास फेकले जात आहे. डेब्रिज, माती येथे टाकण्यास मनाई असताना प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर डेब्रिज आणि माती वाहून नेणारे ट्रक येथे येत आहेत. हा प्रकार ‘हिंदुस्थान पोस्ट’ ने कांजूरमार्ग येथे प्रत्यक्ष जाऊन उघडकीस आणला आहे. रविवारी या केंद्राला भेट दिली असता पाच मिनिटांत तब्ब्ल दहा ट्रक डेब्रिज आणि माती घेऊन कांजूरमार्ग येथील घनकचरा पुनर्रप्रक्रिया केंद्रात आल्याचे आढळले. याबाबत प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांना विचारले असता दिवसाला असे १५० ट्रक येत असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र वनशक्ती या पर्यावरणप्रेमी संस्थेचे प्रकल्प संचालक स्टॅलिन डी यांनी हे खोडून काढले आहे. त्यांनी  दिवसाला येथे ४००-५०० असे ट्रक येत असल्याचा दावा केला आहे. कांजूर मार्ग डंम्पिग ग्राऊंडवर होत असलेल्या बांधकामांबाबतच्या परवानग्यांचे पूरावे सादर करा, तसेच मेट्रो हे मुंबईकरांचे उज्वल भविष्य असल्याचे सांगितले जाते, हे भविष्य आपल्याला कुठे घेऊन जात आहे, हे एकदा येथे येऊन पहावे असे आवाहन स्टॅलिन डी. यांनी केले आहे.

डेब्रिजचा डोंगर

डेब्रिजचे वर्षानुवर्षे विघटन होत नाही. डेब्रिज लपवण्यासाठी या केंद्रात डेब्रिजवर माती टाकली जाते. डेब्रिजचे भलेमोठे डोंगर सध्या या केंद्रात तयार झाले आहेत. रात्रीच्यावेळी या परिसरात मोठी दुर्गंधी पसरते. दर दिवसाला ४००-५०० डेब्रिज आणि माती वाहून नेणारे ट्रक येथे येत असल्याचा दावा स्टॅलिन यांनी केला. तसेच येथील सगळी जागा ही खारफुटी आणि मिठागरांची असून तिथे हा प्रकल्प उभारला जात असल्याचे ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेदरम्यान महापालिकेने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कांजूरमार्गची जागा ही केवळ घनकचरा व्यवस्थापन केंद्रासाठी वापरली जात असल्याचे स्पष्ट केले. तरीही ही जागा महानगरपालिका अवैधरित्या शहरातील बांधकामातून निघणारा डेब्रिज आणि मातीचा कचरा टाकायला देत आहे.

कामासाठी आणली जातेय माती

कांजूर नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाते. बायोरिअॅक्टर सेल नियमानुसार समुद्रसपाटीपासून दोन मीटर उंचीवर असणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे मातीचा वापर करून बायोरिअॅक्टर सेल बनविला जातो व त्यावर विविध प्रकारच्या टेस्ट करून सेलवर लायनर टाकले जातात. त्यानंतर सेलवर कचरा स्वीकारण्याचे काम सुरू केले जाते. सद्यस्थितीत सेल नंबर ६ चे काम सुरू आहे. या कामासाठी सध्या कांजुरमार्ग प्रक्रिया केंद्र येथे माती स्वीकारली जात आहे. – मिनेश पिंपळे, प्रमुख अभियंता, घनकचरा व्यवस्थापक

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.