‘बेस्ट’ सुविधा! आता पाहिजे ‘त्या’ बसने करा प्रवास

121

प्रत्येक बस प्रवाशांना आता हव्या असलेल्या विशिष्ट बस फेऱ्या निश्चित बसभाड्याने निवडण्याची सुविधा बेस्ट उपक्रमाने उपलब्ध करून दिली आहे. सुपर सेवर योजने अंतर्गत ही सुविधा मिळणार आहे. त्यामध्ये बस भाडे प्रति फेरी, तसेच भाडे टप्पाच्या पद्धतीने आकारले जाणार आहे. शिवाय फेऱ्यांची संख्या आणि योजनेचा कालावधी यानुसार एक दिवसापासून ते ८४ दिवसांत पर्यंत आणि दोन फेऱ्यांपासून ते दीडशे फेऱ्यांपर्यंतचे विविध पर्याय प्रवाशांना उपलब्ध असतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.

सुरुवातीचा- शेवटचा थांबा निवडून करा प्रवास

बेस्टच्या या नव्या सुपर सेवर योजनेअंतर्गत बेस्ट उपक्रमाच्या नेटवर्कमध्ये कोणत्याही बस थांब्यापासून कोणत्याही बस थांब्यापर्यंत आणि उपलब्ध भाडे टप्प्यानुसार प्रवासी कुठेही प्रवास करता येऊ शकतो. प्रवाशांना वातानुकूलित किंवा बिगर वातानुकूलित बस गाड्यांचाही पर्यायही उपलब्ध आहे. प्रवास करताना सुरुवातीचा आणि शेवटचा बस थांबा निवडून, त्यादरम्यान प्रवासी आपला प्रवास करू शकतात. प्रवास करण्यासाठी तिकीट किंवा बसपास यापैकी कोणत्याही पर्यायाची निवड प्रवासी करू शकतात. या नवीन सुपर सेवर योजनेअंतर्गत प्रवाशांना त्यांच्या प्रवासाकरीता अधिकाधिक लवचिकता देण्यात आलेली आहे.

बेस्टची सुपर सेव्हर योजना

सध्या अस्तित्वात असलेले विद्यार्थ्यांकरिताचे आणि अमर्यादित अंतराकरिताचे बसपासही या नवीन सुपर सेव्हर योजने अंतर्गत कार्यरत राहतील. ही सुपर सेव्हर योजना बेस्ट उपक्रमाच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचा एक भाग आहे आणि याची अंमलबजावणी ‘चलो’ या भारतातील अग्रगण्य अशा परिवहन तंत्रज्ञानाने युक्त व्यवसाय संस्थेच्या द्वारे करण्यात येणार आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणालीच्या अनुषंगाने डिजिटल तिकीट सोल्यूशनकरिता सदर व्यवसाय संस्था सर्विस प्रोव्हायडर म्हणून बेस्ट उपक्रमाकरिता कार्यरत असेल. बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्याच्या दृष्टीने सदर योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – ‘लालपरी’च्या सेवेतून ११ कर्मचारी बडतर्फ, २५७ जणांना ‘कारणे दाखवा’ नोटीस)

या नवीन सुपर सेवर योजनेअंतर्गत प्रवाशांना त्यांच्या प्रवासाकरीता अधिकाधिक पर्याय खुले राहतील, तसेच अधिक बचत आणि अधिक लवचिकताही मिळेल. बेस्ट उपक्रमाद्वारे ही योजना लवकरच बेस्ट मोबाईल अॅप आणि बेस्ट बस कार्डाच्या सहाय्याने प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येईल, असेही जनसंपर्क विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.