…म्हणून बंगालच्या उपसागरातील वादळाला पडलं ‘असानी’ नाव!

जाणून घ्या यामागची गोष्ट...

बंगालच्या उपासागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला असानी हे नाव भारतीय वेधशाळेने दिले आहे. श्रीलंकेने या वादळाला असानी हे नाव दिले आहे. असानी या शब्दाचा अर्थ राग असा होतो. असानी वादळाचे सायंकाळी तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार असून, उद्या सोमवारी ११५ ते १२५ ताशी वेगाने असानी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात घोंगावणार आहे.

यंदा कोणत्या देशाला मिळाला मान

या नावामागे केवळ भारत नव्हे तर भारतीय उपखंडातील वेगवेगळ्या देशांचा समावेश आहे. यात भारतासह, शेजारचा पाकिस्तान, मालदीव, म्यानमार, श्रीलंका, ओमान, बांग्लादेश आदी देश मिळून भारतीय महासागरात तयार होणा-या वादळाला नावे देतात. यंदा हा मान श्रीलंका या देशाला मिळाला. श्रीलंकन भाषेत राग अनावर झाला की, असानी हा शब्द वापरला जातो. त्यामुळे चक्रीवादळाला श्रीलंकेहून असानी हे नाव मिळाले आहे. या वादळामुळे मंगळवारपासून उत्तर आंध्रप्रदेश आणि नजीकच्या ओडिशा किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होणार आहे. दोन दिवसांनी पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज भारतीय वेधशाळेने दिला आहे.

(हेही वाचा – बंगालच्या उपसागरात ‘असानी’ चक्रीवादळ तयार…)

पावसाच्या आगमानापूर्वीचे बंगालच्या उपसागरातील पहिले चक्रीवादळ

असानी हे यंदाच्या वर्षातील पावसाच्या आगमानाअगोदर बंगालच्या उपसागरात तयार झालेले पहिले चक्रीवादळ आहे. मे आणि जून हे दोन्ही महिने चक्रीवादळाचे समजले जातात. भारतीय उपखंडात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांची निर्मिती जास्त होते. अंदमानच्या समुद्रात मे महिन्याच्या सुरुवातीलाच कमी दाबाच्या निर्मितीची कल्पना भारतीय वेधशाळेला होती. तीन दिवसांपूर्वीच या कमी दाबाची तीव्रता वाढत असल्याचे भारतीय वेधशाळेने जाहीर केले होते. रविवारी सकाळी तयार झालेल्या असानी चक्रीवादळ सध्या ८० ते ९० ताशी किलोमीटर वेगाने समुद्रात वाहत आहे. सायंकाळी १०० ते ११० ताशी किलोमीटर वेगाने वारे वाहतील. सोमवारी सकाळी ११५ ते १२५ ताशी वेगाने वारे वाहतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here