देशात सध्या उष्णतेची लाट सुरु आहे. या वाढत्या उन्हाने अंगाची लाहीलाही झाली आहे. या वाढत्या उन्हात जवळजवळ सगळेच शीतपेयाच्या शोधात असतात. त्यातल्या त्यात लहानांपासून ते मोठ्यांपर्यत उन्हाळ्यात कुल्फीला पसंती देतात.
मे महिना सुट्टीचा महिना, शाळांना सुट्ट्या, त्यामुळे बच्चे कंपनीसाठी या सुट्ट्यांच्या दिवसांत कुल्फी म्हणजे पर्वणीच असते. अशा या सर्वांच्या आवडीच्या कुल्फीचा जन्म झाला तरी कसा ते जाणून घेऊयात…
…म्हणून लागला कुल्फीचा शोध
कुल्फी म्हणजे एका काडीवर गोठवलेले आईस्क्रीम, दुकानातून कुल्फी घ्यायची एकीकडे चालताना मित्र मंडळी, नातेवाईक यांच्यासोबत गप्पा मारता मारता खायची, एवढे साधे गणित आहे या कुल्फीचे. गप्पांच्या ओघात जसा चहा कधी संपतो कळत नाही तसे या कुल्फीचे. सर्वांना आनंद देणारी अशी ही कुल्फी जिने आपल्या अनेक पिढ्या बघितल्या, या कुल्फीचा जन्म 16 व्या शतकाच्या आसपास लागला आहे. कुल्फीचा शोध लावला तो मुघलांनी. शाही जेवण झाल्यानंतर, तोंड गोड करण्यासाठी काहीतरी थंड म्हणून कुल्फीचा शोध लागला.
कमीत कमी सामग्रीमध्ये पदार्थ
कमीत कमी सामग्रीमध्ये हा पदार्थ तयार केला जातो. दूध, बर्फ, सोबतीला केशर, बदाम यांचे मिश्रण एका धातूच्या शंकूमध्ये भरुन ते बर्फात ठेवला जाई, त्यात विशेष म्हणजे हा बर्फ हिमालयातून आणलेला असे, अशा पद्धतीने कुल्फी बनवण्याची त्या काळात सुरुवात झाली.
कालांतराने त्यात अनेक बदल झाले. ज्यात कुल्फ्या वेगवेगळ्या चवीत तयार होऊ लागल्या. हातगाडीवर मिळणारी कुल्फी आता दुकानात मिळू लागली. सध्या फेमस कुल्फी म्हणून प्रसिद्ध आहे ती म्हणजे मटका कुल्फी.
कुल्फी शब्द आला कुठून असा अनेकांना प्रश्न पडला असेल, तर कुल्फी हा शब्द फारसी भाषेतून आला आहे तर काहींचे म्हणणे आहे तो अरेबिक भाषेतून आला आहे. शब्द कोणत्याही भाषेतून आलेला असो आज हा पदार्थ विविध भाषकांच्या पसंतीस पडला आहे.
Join Our WhatsApp Community