‘या’ कादंबरीमुळे महाराजांचा इतिहास मांडण्याची प्रेरणा मिळाली- दिग्पाल लांजेकर

शेर शिवराज- स्वारी अफज़ल खान हा दिग्पाल लांजेकर लिखित व दिग्दर्शित चित्रपट 22 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्ताने दिग्पाल लांजेकर आणि अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी हिंदुस्थान पोस्टशी खास गप्पा मारल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांच्या मालिकेची कल्पना कशी सुचली आणि त्यासाठी प्रोत्साहन कसं मिळालं याबाबत दिग्पाल लांजेकर यांनी माहिती दिली.

अशी मिळाली प्रेरणा

मराठी भाषेतील अनेक थोर साहित्यिकांनी महाराजांचा इतिहास रेखाटला आहे. त्यापैकीच एक म्हणजे गो.नी.दांडेकर. त्यांनी कादंबरीमय शिवकाल हा पाच कादंब-यांचा संच लिहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा शिवकाल हा त्या कादंब-यांचा नायक आहे. या कादंब-यांचं खूप लहानपणी वाचन केलं होतं. तेव्हा या कादंब-यांमधून प्रेरणा घेऊन महाराजांचा हा शिवकाल दृश्य स्वरुपात लोकांसमोर मांडण्याची प्रेरणा मला मिळाली.

(हेही वाचाः महाराजांची भूमिका साकारणा-या चिन्मयनं आपल्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ का ठेवलं? वाचा उत्तर)

या कल्पनेला ‘300’ हा चित्रपट पाहिल्यानंतर मूर्त स्वरुप प्राप्त झालं. त्यांच्या पौराणिक कथेतील थर्मोपाईलीची गोष्ट त्यांनी या चित्रपटातून मांडली आहे. 300 माणसांनी हजारो माणसांना एका खिंडीत अडवल्याचं या चित्रपटात रंजकपणे दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट पाहताना मला सतत बाजीप्रभू देशपांडे दिसत होते. आपल्याकडे बाजीप्रभूंसारख्या महान योद्ध्याची पावनखिंड ही पौराणिक नाही, तर ऐतिहासिक कथा आहे, तिला तसे ऐतिहासिक आधार आहेत. त्यामुळे ही कथा आपण सांगायला हवी, हे प्रोत्साहन मला 300 चित्रपट पाहिल्यानंतर मिळाल्याचं लांजेकर यांनी सांगितलं आहे.

आराध्य दैवतांचं ‘अष्टक’

आपली जी आराध्य दैवतं आहेत त्यांच्याबद्दल आपल्या संतांनी अष्टकं लिहून ठेवली आहेत. त्यामधून त्या दैवताची स्तुती करण्यात आली आहे. त्याच स्वरुपाचं अष्टक आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे श्रीशिवराज अष्टक आहे. आठ चित्रपटांच्या या मालिकेतून महाराजांच्या जीवनातील महत्वपूर्ण प्रसंग आणि घटना लोकांसमोर मांडण्याचा आम्ही ध्यास घेतला आहे, असंही दिग्पाल लांजेकर यांनी सांगितलं.

(हेही वाचाः राज्यात इतकेच कोरोना बळी, तरी सरकारकडून मिळतेय जास्त जणांना भरपाई! काय आहे कारण?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here