विरार येथे फुलपाडा परिसरात राहणा-या राकेश तिवारी यांच्या घरात सापांच्या पिल्लांचा भुलभुलैय्या सुरु झाला आहे. कधी बाथरुममध्ये, कधी पाण्याच्या टाकीत तर कधी कपाटात काळ्या रंगाची सापांची पिल्ले वळवळताना आणि उड्या मारताना पाहायला मिळत आहेत. या प्रकाराने भांबवलेल्या तिवारी यांनी प्रत्येक दोन-तीन दिवसांनी प्राणीप्रेमी संस्थेची मदत घेत चक्क १३ पाणभिवड या पाण्यात राहणा-या सापांच्या पिल्लांना घराबाहेर काढले आहेत.
२६ एप्रिलला सुरुवातील बाथरुममध्ये तिवारी यांना पहिल्यांदा काळ्या रंगाची सापाची पिल्ले आढळली. काही प्रकार समजण्याच्या अगोदरच पिल्ले गायब होत होती. तिवारी यांनी सापांना पकडण्यासाठी ‘स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रेप्लाइल्स एण्ड रिहेबिलिटेशन प्रोग्राम’ (सर्प) या प्राणीप्रेमी संस्थेची मदत घेतली. संस्थेचे स्वयंसेवक चिन्मय शिर्के आणि अनस शेख यांनी तातडीने तिवारी यांच्या घराला भेट दिली.
साप बिनविषारी
सापांची पिल्ले इकडून तिकडून उड्या मारत पळत असल्याने, या दोघांचीही सापांना पकडण्यात करसत झाली. तब्बल ६ सापांना पकडल्यानंतर काळ्या रंगाची ही पिल्ले पाणभिवड या गोड्या पाण्यात राहणा-या सापाची असल्याचे स्वयंसेवकांच्या लक्षात आले. हा साप बिनविषारी असल्याचे समजताच तिवारी कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला. साप नजीकच्या नाल्यातून आला असल्याचा अंदाज सर्पचे पालघर विभागाचे प्रमख पंकज जाधव यांनी व्यक्त केला. सापांच्या सुळसुळाटात कोणी भीतीपोटी सापांचा जीव घेऊ नये, म्हणून पाणभिवडबाबत माहिती आम्ही दिली, असेही जाधव म्हणाले.
घटनेची दोनदा पुनरावृत्ती
शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस तिवारी यांच्या घरी पुन्हा पाणभिवड सापांची पिल्ले आढळून आली. शुक्रवारी तर चक्क कपाटात तीन पिल्लांनी आश्रय घेतला होता. यावेळी सर्पच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण घराचीच झडती घेतली. मात्र कुठेही सापांची पिल्ले आढळली नाही. शनिवारची सकाळी मात्र सापांच्या पिल्लांबाबत झालेल्या प्रकाराने तिवारी कुटुंब चांगलेच चक्रावले. ही सापाची पिल्ले जमिनीवर उड्या मारत घरात इतरत्र फिरत होती. सर्पच्या स्वयंसेवकांनी सकाळीच घराला भेट देत चार पिल्लांना आपल्या ताब्यात घेतले.
गोड्या पाण्यात आढळतो हा साप
पाणभिवड हा भारतभर आढळून येणारा गोड्या पाण्यातील साप आहे. हा साप प्रामुख्याने छोटे मासे खातो. मात्र नाले, नदी, तलावानजीक बेडूक आढल्यास त्याला खाण्यासाठी तो खास जमिनीवर येतो. तो नदीकाठाच्या जमिनीवर येऊन भक्ष्य खातो.
मानवी वस्तीजवळील उंदरांना खाद्य म्हणून पसंती
मानवी वस्तीजवळील कच-याचे वर्गीकरण योग्य होत नसल्याने, उंदरांचा वाढता सुळसुळाट पाणभिवडला माणसांजवळ आणत असल्याची माहिती पंकज जाधव यांनी दिली. उंदीर हे पाणभिवड यांना भक्ष्य म्हणून सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे मानवी वस्तीजवळच्या नाल्यातही त्यांचा अधिवास तयार होत असल्याचे जाधव म्हणाले.
Join Our WhatsApp Community