साताऱ्यातील आगशिवनगर या भागात गणेश वसाहतीत एक विचित्र प्राणी आढळून आला. या वसाहतीत राहणाऱ्या माणिकराव कृष्णाजी पाटील यांच्या अंगणात संध्याकाळी झाडीझुडपात एका झाडाच्या कुंडीमागे लपलेल्या या प्राण्याला पाहून माणिकराव यांना धडकी भरली. भीतीपोटी त्यांनी लगेचच वनविभागाला फोन करून घटनेची कल्पना दिली. छोट्या आकाराचा आणि अंगभर खवले असणारा हा प्राणी ‘खवले मांजर’ असल्याचे वनधिकाऱ्यांना पाहताच क्षणी लक्षात आले. तब्ब्ल आठ वर्षांनी या भागात खवले मांजर आढल्याची माहिती कराड वनविभाग (प्रादेशिक ) चे वनक्षेत्रपाल तुषार नवले यांनी दिली.
कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले यांनी टीमच्या मदतीने खवले मांजराचा बचाव केला. मात्र माणसापासून दूर राहणारा हा निशाचर प्राणी जवळच्या जंगलातूनच वाट चुकून आला असल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी लावला. अंधश्रद्धेचा बळी ठरणाऱ्या खवले मांजराची तस्करी सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र खवले मांजर ज्या वेळी सापडले त्यावेळी अंगभर माती होती, माणसाच्या संपर्कात खवले मांजर असल्यास मातीचा संपर्क फारसा आला नसता अशी माहिती कराड वनविभाग ( प्रादेशिक ) चे वनपाल तुषार नवले यांनी दिली. तस्करीच्यावेळी खवले मांजर कापडात गुंडाळले जाते, त्यामुळे कित्येकदा तस्करीच्या घटनांमध्ये खवले मांजराच्या शरीरावर जखमाही आढळतात. पशुवैद्यकीय चाचणीत खवले मांजर व्यवस्थित असल्याचे निष्पन्न झाले. अंदाजे दीड वर्षाच्या मादी खवले मांजराला संध्याकाळी तत्काळ नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
कुठून आले खवले मांजर
आगशिवनगरच्या नजीकच्या जंगलात दोन महिन्यांपूर्वी वनधिकाऱ्यांना खवले मांजराची विष्ठा मिळाली होती. त्यामुळे जंगलात खवले मांजराचा वावर असल्याची कल्पना वनधिकाऱ्यांना आली. या भागात आठ वर्षांपूर्वी खवले मांजर सापडले होते. त्यानंतर गुरुवारी खवले मांजर आढळून आले.
खवले मांजराच्या तस्करीच्या घटना वाढण्यामागे कारण
अंधश्रद्धेपोटी खवले मांजराच्या तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. भारतीय खवले मांजर हा एक दुर्मिळ सस्तन प्राणी असून वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत शेड्युल 1 भाग 1 मध्ये त्याला मोठे संरक्षण देण्यात आले आहे. त्याची शिकार अथवा तस्करी करणे हा मोठा गुन्हा असून 7 वर्षापर्यंत सक्त कारावास व दहा हजार दंड अशी शिक्षा आहे. हा प्राणी मोठ्या प्रमाणावर वाळवी खाऊन निसर्गात त्यांची संख्या नियंत्रित ठेवतो.
खवले मांजराची सुखरूप सुटका करणारे वनविभागाचे पथक
सातारा वनविभाग ( प्रादेशिक )चे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनक्षेत्रपाल शिशुपाल पवार (फिरते पथक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प) मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे , वनमजूर हणमंत मिठारे , भारत पवार यांनी सदर खवल्या मांजरास पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडले.
Join Our WhatsApp Community