प्रजासत्ताक दिन संचलनात वेगवेगळ्या विभागांचे तसेच राज्यांचे चित्ररथदेखील सहभागी होत असतात. प्रजासत्ताकदिनी राजपथावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्ररथांची निर्मिती करण्याचा मान यंदा दुसऱ्या वर्षीही यवतमाळला मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वीच दिल्ली येथे संपूर्ण संच पोहचला असून, त्या ठिकाणी या सर्व भागांना एकत्रित करण्यात आले. मागील वर्षीही यवतमाळ येथील प्रवीण पिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली कलावंतांनी महाराष्ट्रातील संतांचा गौरवशाली इतिहास या चित्ररथाची निर्मिती केली होती.
(हेही वाचा- यंदा मुंबईच्या संकल्पनेवर असणार नौदलाचा चित्ररथ!)
यवतमाळ येथील ३५ कलावंतांनी साकारली शिल्प
प्रजासत्ताकदिनी राजपथावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्ररथांची निर्मिती करण्याचा मान यंदा दुसऱ्या वर्षीही यवतमाळला मिळाला आहे. या रथासाठीची विविध शिल्प यवतमाळ येथील ३५ कलावंतांनी साकारली आहेत. यातील सर्व शिल्पे भूषण मानेकर, भूषण हजारे, रोशन बांगडकर, नीलेश नानवटकर, उमेश बडेरे, शुभम ताजनेकर, तेजस काळे, राहुल मानेकर, रितिक हेमणे, यश सरगर, वेदांत बकाले, मयूर गवळी, दिनेश चांदोरे, योगेश हेमणे, अभय धारे, संतोष प्रजापती आणि सनी गंगासागर या कलावंतांनी साकारली आहेत. आदिवासीबहुल जिल्हा असलेल्या यवतमाळच्या कलावंतांना चित्ररथावरील शिल्पे साकारण्याचा मान मिळाल्याने सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.
‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ यावर आधारित चित्ररथ
विदर्भातील यवतमाळ येथे साकारलेली ही कलाकृती ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या संकल्पनेवर आधारित आहे. राज्यामध्ये आढळणाऱ्या अनेक दुर्मीळ वनस्पती व प्रजातींच्या शिल्पाचा यामध्ये समावेश आहे. दर्शनी बाजूस ‘ब्लू मॉरमॉन’ फुलपाखराची ८ फूट उंचीची देखणी प्रतिकृती आहे. तसेच, दीड फूट राज्यफूल दर्शविणारे ‘ताम्हण’ याचे अनेक गुच्छ दर्शविले आहेत. त्यावर इतर छोटी फुलपाखरे यांच्या प्रतिमा आहेत. चित्ररथावर १५ फूट भव्य असा ‘शेकरू’ राज्यप्राणी आणि युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेल्या ‘कास पठारा’ची प्रतिमा दर्शविण्यात आलेली आहे.