एरव्ही इतर आरोपींना घेऊन घटनास्थळ, हाऊस सर्च करण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांनाच आरोपीच्या पिंज-यात उभे केल्यावर त्याची अवस्था काय होत असेल? असाच काहीसा प्रकार निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यासोबत घडला आहे. बुधवारी सायंकाळी एनआयएचे पथक सचिन वाझे यांना घेऊन मुंबई ते ठाणे दरम्यान फिरत होते. या दरम्यान एनआयएच्या अधिका-यांनी वाझे यांच्याकडून महत्वाची माहिती मिळवण्यात आली आहे. हे चार तास वाझेसाठी खूप कठीण गेले असल्याचे, एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.
असा होता वाझेंचा प्रवास
राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)च्या तपास पथकातील अधिकारी बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सचिन वाझे यांना घेऊन निघाले होते. आपल्याला कुठे घेऊन जाण्यात येत आहे याची कल्पना देखील वाझे यांना नव्हती. अखेर एनआयएचे पथक वाझे यांना बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी घेऊन गेले. त्याठिकाणी वाझे यांना गाडीतून बाहेर काढून या एनआयएच्या पथकाचे प्रमुख विक्रम खलाटे यांनी वाझे यांना १५ ते २० पाऊले चालण्यास सांगितले. तपास अधिकारी वाझे यांच्या चालण्याचा अंदाज घेत होते, त्यानंतर पुन्हा वाझे यांना गाडीत बसवून हे पथक थेट माहीम कॉजवे येथील खाडीजवळ येऊन गाडी थांबली. वाझे यांना बाहेर काढून खाडीच्या दिशेने इशारे करत एनआयएच्या अधिकाऱ्यांनी वाझे यांना काही प्रश्न विचारले. १० ते १५ मिनिटे चर्चा केल्यानंतर पुन्हा तपास पथक बीकेसीच्या दिशेने वाझेंना घेऊन गेले.
(हेही वाचाः २५ फेब्रुवारी ते १७ मार्च अंबानी-हिरेन प्रकरणाची संपूर्ण ‘पटकथा’…)
चेह-यावर होता तणाव
बीकेसीहून थेट वाझे यांना त्यांच्या ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्स येथील घरी गाडी घेऊन आली. वाझे यांच्या घरात हाऊस सर्च केल्यानंतर वाझे हे आपल्या कुटुंबाला बघून काहीसे भावुक झाले. काही वेळाने एनआयएचे पथक सचिन वाझे यांना घेऊन, साकेत कॉम्पलेक्स येथून दुसऱ्या गेटमधून बाहेर पडली. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हे पथक वाझे यांना घेऊन मुलुंड पूर्व टोलनाका या ठिकाणी एका नाल्याजवळ दाखल झाले. याठिकाणी अर्धा ते एक तास त्यांनी वाझे यांना नाल्याजवळ आणून, त्यांच्याकडे तपासासंदर्भात चौकशी केली. त्यानंतर रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास एनआयएच्या कार्यालयात पथक वाझेंना घऊन दाखल झाले. सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंतचे हे चार तास सचिन वाझे यांच्यासाठी खूप कठीण गेले. वाझेंनी जरी तोंडावर मास्क लावलेलं असलं, तरी त्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचा तणाव जाणवत होता.
एनआयएला काय मिळाले या चार तासांत ?
सचिन वाझे यांना तपासकामी ठिकठिकाणी घेऊन गेलेल्या एनआयएच्या तपास पथकाच्या हाती या चार तासांत महत्वाची माहिती आणि काही पुरावे लागले आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, वाझे यांच्या इमारतीतून आणखी एक मोटार एनआयएनने ताब्यात घेतली असून, त्या मोटारीत एनआयएच्या हाती काही पुरावे लागले आहेत. तसेच मुलुंड टोलनाका येथील नाल्याजवळून पोलिसांना वाझे यांनी गुन्ह्यात वापरलेला एक शर्ट सापडला आहे. त्याचबरोबर या गुन्ह्यासंदर्भात बरीचशी माहिती एनआयएच्या हाती लागली असल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community