शहरात उघडकीस आलेला खोट्या प्रतिज्ञापत्र घोटाळ्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून संबंधितांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात झाली आहे. गुन्हे शाखेकडून सोमवारी जबाब नोंदवण्यात आलेले असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा करण्यात येईल, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
निर्मल नगर पोलिसांनी सुमारे ४ हजार प्रतिज्ञापत्रे जप्त केली
वांद्रे पूर्व न्यायालयाच्या समोरील आर्चिस गॅलरी या दुकानाच्या शेजारी बसलेल्या दोन इसमाकडून पोलिसांनी हजारोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र जप्त करण्यात आले आहेत. ही प्रतिज्ञापत्रे स्टँप पेपरवर तयार करण्यात आली होती. निर्मल नगर पोलिसांनी सुमारे ४ हजार प्रतिज्ञापत्रे जप्त केली आहेत, ही प्रतिज्ञापत्रे शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा देण्यासाठी तयार करण्यात येत असल्याचा आरोप शिंदे गटाचे ठाण्यातील माजी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून करण्यात आला आहे.
(हेही वाचा हिंदूंनी झटका पद्धतीचेच मांस खावे, खाटीक समाजाचे विवेक घोलप यांचे आवाहन )
लवकर या प्रकरणाचा उलगडा होणार
एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्रे एकाच ठिकाणी मिळाल्यामुळे खळबळ उडाली असून या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हे शाखा कक्ष ९ कडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत असून सोमवारी गुन्हे शाखेकडून नोटरी करणारे यांचा तसेच प्रतिज्ञापत्रावर ज्याची नावे आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांना जबाब नोंदविण्यासाठी बोलविण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे, तसेच लवकर या प्रकरणाचा उलगडा होईल अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Join Our WhatsApp Community