राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ‘महिला वाद्य महोत्सवा’ चे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २२ मार्च २०२५ दरम्यान सायंकाळी ६.३० वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, भायखळा (Byculla) येथे हा महोत्सव पार पडणार आहे. महोत्सव सर्वांसाठी निःशुल्क असून रसिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या महोत्सवाची संकल्पना अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar), सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री यांची आहे. विकास खरगे (Vikas Kharage), अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग आणि विभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी सर्वांना महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
(हेही वाचा – मोफत शिक्षणाच्या नावाखाली ख्रिस्ती धर्मांतराचा कट; Morari Bapu यांची गृह राज्यमंत्र्यांकडे तक्रार)
पहिल्या दिवशी २० मार्चला ‘तालसखी – तालवाद्यांची मैफल’ सादर होईल. यामध्ये पं. रवी चारींच्या ‘सितार सिम्फनी’ त महिलांच्या सतारवादनाचा मनमोहक अनुभव रसिकांना मिळेल. त्यानंतर ‘ताल मॅट्रीक्स’च्या जुगलबंदीत तबला, ढोलकी, डफ, बासरी आणि कीबोर्ड यांची लयबद्ध मैफल रंगेल.
दुसऱ्या दिवशी २१ मार्चला ‘स्वरायणी – भक्तिसंगीतातील साज’ सादर होईल. पारंपरिक भक्तिसंगीतातील वाद्यवृंदाबरोबरच ‘अभंग नवा’ हा अनोखा कार्यक्रम सादर होईल. यामध्ये व्हायोलिन, सतार, हार्प, इलेक्ट्रिक गिटारसह विविध वाद्यांची सुरेल मैफल रसिकांना ऐकायला मिळणार आहे.
तिसऱ्या दिवशी २२ मार्चला ‘लोकस्वरा’ कार्यक्रम सादर होईल. महाराष्ट्र, गोवा आणि पाश्चिमात्य लोकसंगीताची मेजवानी यावेळी अनुभवता येईल. ‘इंडिवा’ या ग्रुपचा विशेष कार्यक्रम तसेच ‘लोकपरंपरा’ अंतर्गत विविध पारंपरिक लोकवाद्यांचे सादरीकरण होईल. यामध्ये लावणी आणि लोकनृत्य सादर होणार आहे.
महिलांनी वाद्यसंगीताच्या माध्यमातून रंगवलेला हा महोत्सव रसिकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community