अकोला डोळखांब भागातील चोंधा येथील तीन तरुणांनी बिबट्याने गावातील गायी खाल्ल्याचा राग मनात धरला आणि बिबट्याला विष देऊन मारून टाकल्याची घटना घडली. यापैकी एका आरोपीने बिबट्याचे पाय तोडून त्याची नखे शहापूर येथे विकण्याचा प्रयत्न केला असता हे प्रकरण उजेडात आले. या प्रकरणी तिन्ही आरोपींना वनविभागाने शिताफीने पकडून न्यायालयात सादर केले. या आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
( हेही वाचा : खोटी, आक्षेपार्ह माहिती देणाऱ्या YouTube चॅनेल्सवर केंद्र सरकारची कारवाई)
नेमकी घटना काय
अकोला येथील चोंधा गावात बिबट्याने गावकऱ्याच्या गायी फस्त केल्याच्या घटना लागोपाठ सुरु होत्या. गावातील गायींना बिबट्या भक्ष्य करत असल्याने गावकरीही संतापले होते. गावातील तीन तरुणांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी भटक्या कुत्र्याला विष देऊन मारले. मेलेला कुत्रा खाल्ल्यामुळे बिबट्याही मृत पावला. या घटनेला दोन-तीन महिने उलटल्यानंतर आरोपींनी बिबट्याची नखे अवैधरित्या बाजारात विकण्यास सुरुवात केली.
वनाधिकारी बनले बनावट ग्राहक
बिबट्याची नखे विक्रीसाठी आल्याची माहिती शहापूर वनविभागाला मिळाली. वनाधिकारीच बनावट ग्राहक बनून आरोपीकडून बिबट्याची नखे खरेदी करण्यासाठी शहापुरात भेटले. आरोपीने बिबट्याची नखे दाखवताच वनाधिकाऱ्यानी एका आरोपीला रंगेहाथ पकडले. मंगळवारी एक आरोपी ताब्यात आल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. बिबट्याने गावात गायी मारल्याचा राग मनात बाळगून त्याला मारून टाकल्याचे आरोपीने कबूल केले. अकोल्यात ही घटना घडली असून इतर दोन आरोपी तिथेच असल्याचे आरोपीने वनाधिकाऱ्यांना सांगितले. शहापूर वनाधिकाऱ्यांची टीम मंगळवारी तातडीने अकोल्याकडे रवाना झाली. अखेरीस बुधवारी अकोल्यातील चोंधा गावातून इतर दोन आरोपींना वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. बिबट्याची शिकार तसेच अवैध विक्री प्रकरणी वनाधिकाऱ्यांनी पांडुरंग उघडे (31), भाऊ गांगड (35), काळू गिऱ्हे (31) या तीन आरोपींना शहापूर न्यायालयात सादर केले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.