पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याचा फटका, बिबट्याच्या बछड्यांची प्रकृती गंभीर

151
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पिंजऱ्यातील बंदिस्त प्राण्यांच्या दररोजच्या देखभालीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याचे प्रकरण प्राण्यांच्या जीवावर उठले आहे. उद्यानातील बिबट्याच्या तीन बछडयांना पुण्यातील ‘रेस्क्यू’ या खासगी प्राणीप्रेमी संघटनेकडे उपाचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. दररोजच्या देखभालीसाठी वनविभाग पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याच्या तयारीत आहे, मात्र पशु्वैद्यकीय अधिकारी येणार कधी या प्रश्नाचे उत्तर देण्यास वनविभागाचे वरिष्ठ वनाधिकारी टाळाटाळ करत आहेत.

खासगी पशुवैद्यकीय रुग्णालयातील उपचार अर्धवट सोडून बछडे पुण्यात धाडले

उद्यानात 8 ऑगस्ट रोजी खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या तिन्ही बछड्यांची तपासणी केली होती. तिन्ही बछड्यांमध्ये कॅल्शिअम आणि ड जीवनसत्वाची मोठ्या प्रमाणात कमतरता आढळून आली. त्यानंतर काही दिवसांनी बछडयांना चेंबूर येथील खासगी पशु्वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे बिबट्यावर औषधोपचारांसह एक्यूपंक्चर दिले गेले. मात्र उपचार अर्धवट सोडून गुरुवारी दुपारी तिन्ही बछडयांना तातडीने रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेकडे उपचारांसाठी दाखल केले गेले.

याआधी बछडे पुण्यात पाठवले होते

रेस्क्यू याच प्राणीप्रेमी संस्थेला नाशिक वनविभागाने उपचारांसाठी तीन बछडयांना दिले होते. आईपासून विभक्त झालेल्या काही दिवसांच्या या बछडयांना दररोजच्या देखभालीची नितांत आवश्यकता होती. 10 जून रोजी बछड्यांचे कायमचे पालकत्व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने स्वीकारले. रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेच्या प्रमुख नेहा पंचमिया यांनी संस्थेकडे उपचार घेतल्यानंतर बछड्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती, असा दावा केला आहे. मात्र उद्यानात आल्यानंतर बछडयांवर केलेल्या औषधोपचाराबाबत कोणीही माहिती देण्यास तयार नाही. त्यामुळे बछड्यांच्या दैनंदिन संगोपनाबद्दल दाट संशय व्यक्त केला जात आहे.
( हेही वाचा: बोरिवलीत ४ मजली इमारत कोसळली, बघा व्हिडिओ )

बछड्यांच्या शरीरात ठीकठिकाणी फ्रॅक्चर
बिबट्याचे तीन बछडे गुरुवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून आमच्याकडे उपचारांसाठी पाठवले गेले. 8 ऑगस्ट रोजी झालेल्या रक्ततपासणीत तिघांच्याही शरीरात कॅल्शिअम आणि ड जीवनसत्वाची कमतरता असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी त्यांच्या शरीरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर आहेत. त्यांना उठता आणि बसताही येत नाही. तिन्ही बछड्यांची प्रकृती गंभीर आहे. आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.