बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आजारी बिबट्याच्या बछड्यांची पुण्यातील रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेत उपचारासांठी रवानगी करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी तातडीने बिबट्यांच्या तीन बछड्यांना पुण्यात हलवण्यात आले. मात्र याबाबत माहिती घेण्यासाठी गुरुवारी वन्यजीव पश्चिम विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ व्ही क्लेमेंट बॅन यांनी माहिती घेऊन सांगतो, असे सुरुवातीला आश्वासन दिले. शुक्रवारी सकाळपर्यंत माहिती न आल्याने डॉ बॅन यांनी उद्यान प्रशासनाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. उद्यानाचे संचालक व मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जून यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
उद्यानात नियमित पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने, पिंज-यातील अंदाजे ८७ बंदिस्त प्राण्यांच्या रोजच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाघाटीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी अहवाल पूर्ण होताच माहिती दिली जाईल, असे आश्वासन देऊनही मुख्य वनसंरक्षकांकडून अद्यापही माहिती दिली गेलेली नाही. त्यामुळे उपचारादरम्यान सहभागी असलेल्या कोणत्या अधिका-यांना वाचवण्याच्या प्रयत्नात उद्यान प्रशासन गुंतले आहे, याबाबतचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. वाघाटीच्या पिंज-याच्या जागेवरही सुरुवातीपासून प्रश्न निर्माण केला जात आहे.
नाशिकमध्ये आईपासून विभक्त झालेल्या तीन बिबट्याच्या बछड्यांना वाचवण्यासाठी सुरुवातीला नाशिक वनविभागाने पुण्यातील रेस्क्यू या खासगी प्राणीप्रेमी संस्थेकडे ही कामगिरी सोपवली. बछड्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून आल्यानंतर १० जून रोजी बछडे संगोपनासाठी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवले गेले. उद्यानातील रुग्णालयात उपचार दिल्यानंतर बिबट्या पुनर्वसन केंद्रात पोहोचल्यानंतर बछड्यांमध्ये फारशी सुधारणा दिसली नाही. परिणामी, त्यांना चेंबूरमधील खासगी दवाखान्यात अॅक्यूपंक्चर उपचारपद्धती दिल्या गेल्या. परंतु संपूर्ण उपचार पूर्ण होण्याअगोदरच गुरुवारी सायंकाळी तिन्ही बछड्यांना पुण्यात पुन्हा पाठवले गेले. बिबट्यांच्या उपचारपद्धतीबाबत माहिती देण्यासाठी रेस्क्यूला फोन केला असता, कालांतराने माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले.