मुंबईतील तब्बल ३४७ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वरळी किल्ल्याचा जीर्णोद्धार करण्याचा कामाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर तीन महिन्यांनी पहिल्या टप्प्यातील जीर्णोद्धार कामाला सुरुवात झाली आहे. या पहिल्या टप्प्यातील जीर्णोद्धार कामांचे भूमिपूजन आमदार सुनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
( हेही वाचा : दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक, वाहन विमा महागणार! १ जून पासून कोणते बदल होणार वाचा…)
वरळी किल्ल्याची तटबंदी आणि किल्ल्यावरील पोर्तुगीजकालीन बांधकाम वैशिष्ट्ये आजही दिमाखात उभे आहेत. याच वरळी किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे व सभोवतालच्या परिसराच्या सुशोभिकरणाचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारितील किल्ल्यांपैकी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये वरळी किल्ला हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. उपलब्ध माहितीनुसार सदर किल्ला इसवी सन १६७५ मध्ये बांधण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये वरळी किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम लवकरच सुरु करण्यात येत आहे. या कामाकरिता महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, नागरी नियोजन सल्लागार मे. GSA तसेच पुरातन वास्तू जतन सल्लागार विकास दिलावरी यांचे सहकार्य लाभले आहे.वरळी किल्ल्याचा जीर्णोद्धार, सभोवतालच्या परिसराचे सुशोभिकरण आणि परिसरामध्ये आकर्षक प्रकाशझोत प्रणाली बसविणे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वास्तु संचालनालयाच्या संचालक यांचे ‘ना हरकत’ पत्र यापूर्वीच प्राप्त झाले आहे. वरळी किल्ल्याच्या जीर्णोद्धारांतर्गत प्रामुख्याने स्थापत्य स्वरुपाची कामे करण्यात येणार असून तटबंदीची डागडुजी देखील करण्यात येणार असल्याची माहिती जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.
सुशोभिकरणात अशाप्रकारे केली जाणार कामे
- वरळी किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस व दक्षिणेकडील बाजूस समुद्र किनारी असलेल्या मोकळ्या जागेत सुरु, समुद्रफुल इत्यादी झाडांची आकर्षक लागवड करण्यात येणार आहे.
- तसेच किल्ल्याबाहेरील मोकळ्या जागेत हिरवळ व इतर शोभेची झाडे लावून बेसॉल्ट दगडाच्या पायवाटा देखील तयार करण्यात येणार आहेत.
- वरळी किल्ल्याची महती आणि माहिती सांगणारे फलक, दिशादर्शक फलक इत्यादी देखील परिसरात जागोजागी बसविण्यात येणार आहेत.
- वरळी किल्ल्यालगत विद्युतीकरण व प्रकाशझोत योजना तात्पुरती कार्यान्वित करण्यात आलेली असून, ही प्रकाशझोत व्यवस्था कायमस्वरुपी कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे.