महाराष्ट्रातील ३ शास्त्रज्ञांनी तामिळनाडूत शोधल्या ३ नव्या पालींच्या प्रजाती

तामिळनाडू राज्यातील तीन नव्या पालींच्या प्रजातींचा ठाकरे वन्यजीव फाऊंडेशन या वन्यप्रेमी संस्थेच्या तीन शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे. या तिन्ही पाली निमॉस्पीस प्रजातीच्या असून, ‘निमॉस्पीस अळगू’ , ‘निमॉस्पीस कलकडेनसीस’ आणि ‘निमॉस्पीस मंदाथुराईएनसीस’ या नावाने तीन नव्या पाली जगभरात ओळखल्या जातील. ठाकरे वन्यजीव फाऊंडेशनच्या तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि इशान अगरवाल यांनी या नव्या पालींचा तामिळनाडू राज्यात शोध लावला.

(हेही वाचा – नॉट रिचेबल असलेले ‘शिवसेने’चे नेते एकनाथ शिंदे ‘भाजपा’त होणार सामील?)

पश्चिम घाटांतील पालींची संख्या आता ४७ वर

गेल्या वर्षी उन्हाळ्यात शास्त्रज्ञांना या तीन पालींचे अस्तित्व तामिळनाडूतील तीन वेगवेगळ्या भागांत आढळले. तिन्ही पालींचा आकार ३५ ते ३८ मिमी दरम्यान आहे. तिन्ही पालींपैकी एका पालीला ‘निमॉस्पीस अळगु’ हे नाव त्याच्या सौंदर्यावरुन पडल्याचे शास्त्रज्ञ अक्षय खांडेकर सांगतात. तमिळ भाषेत अळगु या शब्दाचा अर्थ सुंदर असा होता. ही पाल तिरुकुरुंगुडी या जंगलात आढळून येते. कलकडेननीस या जंगल परिक्षेत्रात आढळलेल्या पालीला ती राहत असलेल्या ठिकाणावरुनच आता ओळखले जाईल. ‘निमॉस्पीस कलकडेनसीस’ या नावाने ही पाल जगभरात ओळखली जाईल. तिस-या पालीच्या नावामागेही तिच्या अधिवासाला जगभरात ओळख मिळाली आहे. मंदाथुराईएनसीस या जंगलात आढळलेली ‘पाल निमॉस्पीस मंदाथुराईएनसीस’ या नावाने ओळखली जाईल. या संशोधनामुळे पश्चिम घाटांतील पालींची संख्या आता ४७ वर गेली आहे.

जाणून घ्या तिन्ही पालींच्या अधिवासाबद्दल 

  • ‘निमॉस्पीस अळगु’ आणि ‘निमॉस्पीस मंदाथुराईएनसीस’ या दोन्ही पालींच्या प्रजाती समुद्रसपाटीपासून २०० ते ३०० मीटर उंचावरील शुष्कपानगळी जंगलातील दगडांवर आढळून येते.
  • दिवसा सक्रीय असलेली ही पाल किटकांना भक्ष्य म्हणून पसंत करते.
  • ‘निमॉस्पीस कलकडेनीस’ ही पाल समुद्रसपाटीपासून ९०० ते १ हजार १०० मीटर अंतर उंचावर सापडते.

दक्षिण भारतात संशोधनाला वाव

दक्षिण भारतात वन्यजीवांबाबत विशेषतः सरपटणारे प्राणी, कोळी, विंचू तसेच माशांच्या विविध प्रजातींबाबत फाससे संशोधन झालेले नाही. कर्नाटक आणि तामिळनाडूतील पालींच्या संशोधनानंतरही येथे संशोधनाला बराच वाव आहे.
अक्षय खांडेकर, शास्त्रज्ञ, ठाकरे वन्यजीव फाऊंडेशन

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here