पुण्यातील वाघोलीत मोझे कॉलेज रस्ता येथील परिसरात असणाऱ्या एका सोसायटीच्या चेंबरमध्ये काम करताना अडकून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे. यातील एकाचा शोध सुरू असल्याची माहिती मिळतेय.
(हेही वाचा – संजय राऊतांपाठोपाठ अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगातच!)
वाघोली येथील मोझे कॉलेज रस्त्यावर असणाऱ्या एका सोसायटीचे चेंबर साफ करण्यासाठी दोन कर्मचारी ड्रेनेजमध्ये उतरले होते. मात्र बराच वेळ होऊनही खाली गेलेल्या दोघांचा काही प्रतिसाद न मिळाल्याने वरती असणारा एक कर्मचारी त्यांना शोधण्यासाठी खाली उतरला. मात्र, तो देखील गायब झाला. या घटनेची माहिती पीएमआरडीच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
चेंबरमध्ये अडकलेल्या तिघांचा जवानांनी शोध सुरू केला. अगदी काही वेळात अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांचा शोध घेत त्यांचे मृतदेह बाहेर काढले. तर एकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. लवकरच तिसऱ्या व्यक्तीला शोधण्यास यश मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community