धक्कादायक ! मुंबईत दररोज 3 बलात्कार होतात

154

मुंबईत महिला, अल्पवयीन मुली आणि तरुणींवर झालेल्या बलात्काराची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मागील अकरा महिन्यांत मुंबईत ८२८ बलात्कारांचे गुन्हे दाखल झाले आहे. या आकडेवारी नुसार मुंबईत दररोज बलात्काराच्या सरासरी ३ घटनांची नोंद मुंबईतील पोलीस ठाण्यात होत आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी बलात्काराच्या १३५ गुन्हे वाढले आहेत.

४८४ अल्पवयीन मुलींवर बलात्कार

मुंबईत मागील वर्षापेक्षा या वर्षी महिलांवरील गुन्ह्यात वाढ झालेली आहे. सकिनाका येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोत एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या घटनेनंतर महिला आणि तरुणीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक पुन्हा एकदा सक्रिय करण्यात आले आहे. निर्भया पथकाकडून मागील काही महिन्यात चांगली कामगिरी करण्यात आली, तसेच अनेक ठिकाणी गुन्हे रोखण्यास या पथकाला यश आलेले आहे. एवढे करून देखील मुंबईत जानेवारी ते नोव्हेबर २०२१ या कालावधीत ८२८ बलात्काराची नोंद विविध पोलिस ठाण्यात झालेली आहे. ही धक्कादायक आकडेवारी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर टाकण्यात आलेली आहे. अकरा महिन्याच्या कालावधीतील आकडेवारी पहाता मुंबईत दररोज ३ बलात्काराच्या घटना घडत आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे ८२८ गुन्ह्यापैकी अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे ४८४ गुन्हे दाखल असून त्यात ९८ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे.

१,९२० विनयभंगाचे गुन्हे

अकरा महिन्याच्या कालावधीत मुंबईत १,९२० विनयभंगाचे गुन्हे घडले असून त्यापैकी १६०६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. महिला आणि अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या गुन्ह्यात देखील वाढ झालेली असून अकरा महिन्याच्या कालावधीत अपहरणाचा १००८ गुन्हे मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे, त्यापैकी ८६५ गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली असून पीडित मुलींची सुखरूप सुटका करून आरोपींना अटक करण्यात आलेले असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. १३ ते १७ या वयोगटातील मुलींच्या अपहरणाचे प्रमाण सर्वाधिक असून प्रेम प्रकरणातून मुली प्रियकरासोबत निघून जातात त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा घरी परत येत असतात, मात्र १८ वयोगटापेक्षा कमी वय असल्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याने अपहरणाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.