‘पर्यावरणाचं जतन करायचं तर त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. त्यासाठी प्लॅस्टिकचा वापर कमी करायचा तर कापडी पिशव्यांचा वापर वाढला पाहिजे म्हणून ‘नो प्लॅस्टिक कॅम्पेन मोर रायपूर’ ही चळवळ सुरू केली आणि आत्तापर्यंत ३८ हजार पिशव्या वाटल्या आहेत.’ हे बोल आहेत चळवळीच्या ब्रॅंड अॅम्बेसिडर ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी आपटे यांचे. ‘रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ पुणे साऊथ लिटरेचर’च्या इन्स्टॉलेशनच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून शुभांगी आपटे बोलत होत्या. रो. पल्लवी गोरे आणि रो. तृप्ती कुलकर्णी यांचे अनुक्रमे चेअर आणि सेक्रेटरी म्हणून इन्स्टॉलेशन झालं. रोटरी वर्ष २०२२-२३ साठी या पदांचा अधिभार त्या सांभाळतील.
‘नेतृत्व बदललं, माणसं बदलली तरी कामात सातत्य राहावं, या दृष्टीने रोटरीचं काम खूप महत्त्वाचं आहे. या वर्षी अर्धवट राहिलेलं काम पुढच्या वर्षी पूर्ण केलं जातं. त्यामुळं अर्धवट राहिली तरी चालतील पण नवनवीन कामं सुरू करा…’ असा कानमंत्र रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचे चार्टर मेंबर पीपी रो. अनिल सुपनेकर यांनी दिला. रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचे प्रेसिडेंट रो. संजीव ओगले यांनीही त्यांचं मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केलं.
पुस्तकबोली कार्यक्रम वेगळा वाटला
‘आपल्या मनात येईल ते लिहून टाकावं, बोलून टाकावं. हा काय म्हणेल, त्याला काय वाटेल याचा विचार करू नये.’ असं लोकप्रिय निवेदक-सूत्रसंचालक, मुलाखतकार, लेखक सुधीर गाडगीळ म्हणाले. ‘नेहमीच कार्यक्रम होतात, मुलाखती होतात पण आजचा ‘पुस्तकबोली’ कार्यक्रम मला वेगळा वाटला, आवडला…’ अशी पावती त्यांनी पुढं दिली. लिटरेचर क्लब असं काही रोटरीमध्ये आहे हे मला खूप आवडलं आणि अशा प्रकारे जर क्लब साहित्यक्षेत्रासाठी काम करणार असेल तर माझ्याकडून सर्व प्रकारची मदत करायला मी तयार आहे. अशा कार्यक्रमांसाठी वेगवेगळे लेखकसुद्धा मी सुचवीन अशी इच्छा गाडगीळ यांनी व्यक्त केली.
सर्वांना कापडी पिशव्या भेट दिल्या
रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचे तसंच इतरही रोटरी क्लब्जचे अनेक पदाधिकारी, सभासद आणि साहित्यक्षेत्रातले तसंच पत्रकारितेच्या क्षेत्रातले विविध मान्यवर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. प्रमुख पाहुण्या शुभांगी आपटे यांनी सर्वांना कापडी पिशव्या भेट दिल्या. रो. नमिता आफळे, अॅन यामिनी पोंक्षे आणि ‘रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ पुणे साऊथ लिटरेचर’च्या चार्टर चेअर उल्का पासलकर यांनी अभिवाचन केलं.
Join Our WhatsApp Community