गेटवे ऑफ इंडियाजवळील तिकीट प्लाझा हटवून बदलला जाणार लूक

152

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील तिकीट प्लाझाच्या जागेवरील तात्पुरते बांधकाम हटवून आता या परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. सध्याच्या प्लाझा इमारतीचे बांधकाम पाडून त्याजागी नवीन प्लाझाचे बांधकाम करून या परिसराला हेरीटेजचा नवीन लूक निर्माण करत खुल्या पध्दतीने प्लाझाची रचना केली जाणार आहे. आकर्षक विजेच्या दिव्यांसह विद्युत रोषणाई आणि बसण्याची आकर्षक आसने याप्रकारे हा परिसर सुशोभित करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : Virat Kohli Birthday : कोहलीचे टॉप ५ ‘विराट’ विक्रम; बरोबरी करणे अशक्य)

गेट वे ऑफ इंडियाचा परिसर हा देशासह विदेशातील पर्यटकांचा आकर्षणाचे केंद्र आहे.या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंदांचा पुतळा असून येथील दगडी कारंजे हेही देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असते. याठिकाणांहून एलिफंटा, नवी मुंबई, मांडवा येथे जाणाऱ्या बोटी निघतात. सध्या अस्तित्वात असलेल्या तिकीट प्लाझामुळे गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराजांचा व कारंज हे पर्यटकांना दिसत नाही. त्यामुळे येथील अनेक छोट्या वास्तू व अतिरिक्त विजेचे खांब तसेच सीसीटीव्हीचे खांब यामुळे परिसराच्या सौंदर्याला बाधा येते. त्यामुळे पुरातन वास्तूचा हा परिसर अधिक सुंदर दिसण्यासाठी सध्याचा प्लाझा तोडून, त्याठिकाणी नवीन प्लाझा बांधून सर्व सुविधा एकाच खांबावर घेऊन या परिसराचे सौदर्यीकरण करण्याचा निर्णय महापालिकेच्या पुरातन वास्तू विभागाने घेतला आहे. महापालिकेच्या माध्यमातून यासाठी विविध करांसह सुमारे ९ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी एम. देवांग कन्स्ट्रक्शन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे.

महापालिकेच्या पुरातन वास्तू विभागाचे प्रमुख अभियंता संजय सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गेट वे ऑफ इंडियाचे जतन हे महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागामार्फत केले असून हा परिसर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीचा असून देखभाल महापालिकेच्यावतीने केले जाते. येथील तिकीट प्लाझाच्या इमारतीमुळे येथील सौंदर्याला बाधा येत असल्याने ते बांधकाम पाडून खुल्या पध्दतीचे प्लाझा विकसित केले जाईल. तसेच आजूबाजूचा परिसर भाग रमणीय केला जाणार असून उच्चदर्जाची प्रदर्शक व्यवस्था तसेच नवीन कचरा कुंड्या, झाडाच्या कुंड्या, बसण्याची आसने बसवली जाणार आहे. त्यामुळे एकप्रकारे हा सर्व परिसर सुशोभित केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.