देशातील ‘टायगर कॉरिडॉर’ची संख्या वाढविणार

देशातील वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्यामुळे, वाघांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार देशातील ‘टायगर कॉरिडॉर’ची संख्या वाढविणार आहे. सध्या देशात 32 ‘टायगर कॉरिडॉर’ असून यात आणखी 6 ते 7 नवे ‘कॉरिडॉर’ वाढवण्यात येणार आहेत. देशातील 2018 च्या जनगणनेनुसार भारतात 2967 वाघ आहेत.

( हेही वाचा : महालक्ष्मी रेसकोर्सचे थकीत भाडे वसूल करण्याचे महापालिकेला निर्देश? नगरविकास खात्याने पाठवले पत्र)

सध्याच्या गणनेत वाघांची संख्या दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. पर्यावरण व वन्यजीव मंत्रालयाने त्यांचे अपघाती मृत्यू व शिकारी रोखण्यासाठी त्यांचे ‘निवारे’ वाढविण्याची योजना अंतिम टप्प्यात आणली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत वाघांच्या लोकसंख्या व्यवस्थापनावर विस्ताराने चर्चा करण्यात आली. त्यात बिहार, ओडिशा, मिझोराम, झारखंड, केरळ यांसारख्या राज्यांच्या वनक्षेत्रात कॉरिडॉरचा विस्तार करण्याच्या शक्यतांवर चर्चा करण्यात आली आणि राजस्थानमधील कुंभलगडला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यासाठी ही बाब पुन्हा राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे मान्य केले.

महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील वनक्षेत्रात व्याघ्र कॉरिडॉरच्या विस्ताराच्या शक्यतांवरही चर्चा करण्यात आली. देशात गेल्या एका वर्षात मृत्युमुखी पडलेल्या 116 वाघांपैकी बहुतांश वाघांना अपघात आणि शिकारीच्या घटनांमुळे जीव गमवावा लागला होता. व्याघ्र कॉरिडॉरच्या विस्तारामुळे वाघांचे संवर्धनही होईल. सध्या देशात 32 व्याघ्र कॉरिडॉर आहेत. भारतातील मध्य प्रदेशात सध्या सर्वाधिक 526 वाघ असून त्याखालोखाल कर्नाटकात 524, उत्तराखंडमध्ये 442, महाराष्ट्रात 312 आणि तामिळनाडूत 265 वाघांचा समावेश आहे. ज्याठिकाणी वाघांची संख्या जास्त आहे तेथून त्यांचे प्रमाण कमी असलेल्या अधिवासांत त्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया वेळोवेळी केली जाते. प्रस्तावित कॉरिडॉरचा विस्तार योग्य पद्धतीने झाल्यास वाघांची संख्या वाढण्याबरोबरच त्यांच्या संवर्धनाचा मार्गही सुकर होईल असे मंत्रालयाला वाटते. वन्यजीव मंत्रालयाच्या वतीने राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक अभयारण्यांमधील वाघांचे कमी संख्येच्या व्याघ्र प्रकल्पांतील स्थलांतर सध्या सुरू आहे. त्यानुसार काही वाघांना, विशेषतः नर वाघांना सातपुडा, मुकुंद्रा हिल्स, सरिस्का आणि विषधारी व्याघ्र प्रकल्पात हलविण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here