अवयव तस्करीसाठी वाघाची शिकार!

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यांतर्गत येणाऱ्या मोसम गावात वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या शेजारी उच्च दाबाची विद्युत वाहिनी आहे. याच तारेच्या विजेचा धक्का देऊन वाघाची शिकार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान वाघाची शिकार केल्यानंतर त्याचा मृतदेह नाल्याच्या काठी पुरून ठेवण्यात आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

वन विभागात खळबळ

आलापल्ली वनविभागाअंतर्गत असलेल्या अहेरी वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्र मोसम मधील कक्ष क्र. ६१५ मध्ये वाघाची शिकार करून अवयवाची तस्करी केल्याची घटना उघडकीस आल्याने आलापल्ली वन विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोसम गावालगत असलेल्या कक्ष क्र. ६१५ मधील नाल्यालगत दुर्गंधी (उग्रवास) व माश्या उडत असल्याची माहिती वन विभागाला प्राप्त झाली होती. त्याच माहितीच्या आधारे घटनास्थळी आज, गुरुवारी ३० डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास तपास केला असता जमिनीत काहीतरी पुरून असल्याचे दिसले. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी जमीन उकरून पाहिली असता तेथे चक्क वाघाचा मृतदेह आढळून आला.

( हेही वाचा : सुरु होण्यापूर्वीच ‘बायोमेट्रीक’ हजेरीला कामगार संघटनांचा विरोध )

अवयवांच्या तस्करीसाठी शिकार

सदर मृतदेह ८ दिवसांपूर्वीचा असल्यामुळे दुर्घंध पसरला होता. तसेच मृतदेहाला किडे लागले होते. वन कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने सदर मृतदेह बाहेर काढला. यावेळी वाघाचे डोके आणि पायाचे पंडे बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्यामुळे अवयवांच्या तस्करीसाठी ही शिकार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर  उच्च दाबाची विद्युत तार आहे. वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी उच्च दाबाच्या तारेचा वापर करत, जाळे पसरवून ७ ते ८ दिवसाआधी वाघाची शिकार करून जमिनीत पुरून ठेवले असावे असा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here