गडचिरोलीतील आरमोरी विभागात शुक्रवारी माणसावर वाघाचा हल्ला झाला होता. या भागांतून सिटी १ हा हल्लेखोर वाघ गुरुवारपासून गायब असताना नेमक्या कोणत्या वाघाने हल्ला केला आहे, याची माहिती अद्यापही वनविभागाला मिळालेली नाही. आरमोरीतील वडसा येथे जागोजागी वाघांच्या हालचाली कैद करण्यासाठी कॅमेरा ट्रेप लावलेले आहेत. मात्र कोणता वाघ शुक्रवारी माणसावर हल्ला करुन गायब झाला, हे अद्यापही कोडे वनविभागाला सुटलेले नाही.
(हेही वाचा – आता बस्स! उद्धव ठाकरे संतापले अन् म्हणाले, “४० डोक्याच्या रावणाने रामाचे धनुष्यबाण…”)
गडचिरोली वनविभागाच्या माहितीनुसार, वडसा येथे अंदाजे २० वाघांचा संचार सुरु आहे. मात्र वडसा येथे ज्यावेळी सिटी १ वाघाचा प्रवेश होतो, त्यावेळी माणसांवर हल्ले वाढल्याची नोंद होते. या भागांत टी १ नर वाघाचे वर्चस्व आहे. टी १ चे अंदाजे वय ९ वर्षांच्या आसपास असल्याने त्याला आता त्याच्या प्रदेशावर वर्चस्व अगोदरसारखा कायम ठेवण्यात अपयश येत आहे.
वडसा येथे सिटी १ तसेच टी १ वाघही सध्या वनविभागाच्या कॅमेरा ट्रेपमध्ये दिसून येत नाही आहे. अशातच टी ६ या वाघीणीबाबत वनाधिका-यांचा संशय आहे. या वाघीणीने आतापर्यंत अंदाजे पाच जणांचा बळी घेतला आहे. या वाघालाही जेरबंद करण्याचे आदेश आहेत. मात्र सिटी १ प्रमाणे टी ६ वाघीणही वनाधिका-यांना तुरी देत गायब होण्यात यशस्वी होत आहे. परिणामी, वडसा येथील माणसांवर वाघांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत वनाधिका-यांची एक खास टीम गावागावांत जाऊन सकाळी आणि संध्याकाळी वाघांच्या संचाराच्यावेळी गावक-यांनी जंगलात जाऊ नये, यासाठी खास आवाहन करत आहे.
Join Our WhatsApp Community