एसटी कर्मचाऱ्यांंनी महामंडळाचे सरकारमध्ये विलिगीकरण करावे, ही मागणी करत संप पुकारला होता. आझाद मैदानावरील हा संप पगारवाढीच्या घोषणेनंतर मागे घेण्यात यावा, असे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना करण्यात आले होते. परंतु अद्यापही अनेक कर्मचारी कामावर रूजू झालेले नाहीत. त्यामुळे एकूण दहा हजार कामगारांना निलंबित करण्यात आलं आहे. पण या कामगारांना शेवटची संधी म्हणून सोमवारपर्यंत कामावर हजर राहण्याचे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत. सोमवारपर्यंत मेस्मा न लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली आहे.
चर्चेतून निर्णय
एसटी महामंडळ संघटनांचे अधिकारी, प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून सोमवारपर्यंत मेस्मा न लावण्याचा निर्णय अनिल परब यांनी घेतला आहे. अनेक एसटी कामगारांना कामावर हजर राहायचे आहे पण, काही लोक त्यांची अडवणूक करतात म्हणून अशा कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत शेवटची संधी असेल अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. जे डेपो ५० टक्के कामगारांच्या क्षमतेने सुरू होतील त्याठिकाणी रूजू व्हावे शिवाय, सोमवारपर्यंत रूजू होणाऱ्या कामगारांचे निलंबन देखील मागे घेण्यात येणार आहे. जिथे ५० टक्के ही संख्या पूर्ण होत नाही. त्यांना बाजूच्या डेपोत सामावून घेतलं जाणार आहे. त्याबाबतचे लेखी आदेश काढणार आहोत असेही परब यांनी स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : ‘हे’ तीन जिल्हे भ्रष्टाचारात अव्वल क्रमांकावर… )
तक्रार करा
कामावर रूजू होण्यास कोणीही अडवणूक केली तर, थेट पोलिसात तक्रार करावी किंवा डेपोच्या अधिकाऱ्यांना सांगावे असे आदेश कर्मचाऱ्यांना परब यांनी दिले आहेत. एसटी महामंडळाच्या संपामुळे एसटीचे १० हजार कर्मचारी निलंबित झाले असून एसटीला ५५० कोटींचे नुकसान झाले आहे.