मुंबईतील मालाडमधील एका क्रीडांगणाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून वादंग निर्माण झालेला असतानाच या क्रीडांगणाची जागा ही उद्यान व क्रीडांगणासाठी राखीव नसल्याची बाब समोर आली आहे. या क्रीडांगणाच्या जागा ही महापालिकेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व इतर तत्सम कामांसाठी प्रदान करण्यात यावी अशाप्रकारची नोंद मालमत्ता पत्रकावर अर्थात प्रॉपर्टी कार्डवर असल्याची माहिती समोर आहे. त्यामुळे या क्रीडांगणाचा विकासही वादात अडकण्याची शक्यता असून महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या जागेवर क्रीडांगण उभारले गेल्याने हे बांधकामही आता अनधिकृत ठरले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आहे.
( हेही वाचा : टिपू सुलतानच्या नावाची पाटी काढायला पालकमंत्र्यांना कोणी रोखले? )
मालाडमधील एका मोकळ्या जागेचा विकास स्थानिक काँग्रेस आमदार व शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी करून त्याठिकाणी म्हाडाच्या निधीतून क्रीडांगण उभारले आहे. ही जमिन जिल्हाधिकारी यांची असल्याने त्यावर म्हाडाच्या निधीतून क्रीडांगणाचे काम करून त्याठिकाणी प्रवेशद्वार उभारण्यात आले. या प्रवेशद्वारावर टिपू सुलतान क्रीडांगण असे नाव दिल्याने यावरून निर्माण झालेल्या वादावर आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
हा भूखंड महापालिकेला सांडपाणी प्रकल्प राबवण्यासाठी राखीव
भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे व पक्षनते विनोद मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेत हा गौप्यस्फोट केला आहे. ही जमिन जिल्हाधिकारी यांच्या मालकीची असल्याचे बोलले जात असले तरी या जागेच्या वापराबाबत केलेल्या फेरफारानुसार हा भूखंड महापालिकेला सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी व त्याप्रकारच्या वापरासाठी प्रदान करण्यात यावा अशाप्रकारची नोंदच मालमत्ता पत्रकावर असल्याची कागदपत्रेच पत्रकार परिषदेत सादर करण्यात आली आहे. हा फेरफार क्रमांक९०३ प्रमाणे २८ जानेवारी २०२० रोजी झालेला आहे. नगर भू अधिकारी गोरेगाव यांच्या स्वाक्षरीने या मालमत्ता पत्रकात फेरफार झाल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असल्याचे शिंदे व मिश्रा यांनी सांगितले.
त्यामुळे ज्याठिकाणी क्रीडांगण उभारले आहे, त्यावर कोणत्याही प्रकारचे उद्यान किंवा क्रीडांगणाचेही आरक्षण नाही. हा भूखंड महापालिकेला सांडपाणी प्रकल्प राबवण्यासाठी राखीव केलेला असताना यावर क्रीडांगणाचे बांधकाम करण्यात आलेच कसे असाही सवाल शिंदे व मिश्रा यांनी केला आहे.
( हेही वाचा : ठाकरे सरकार मास्क करणार हद्दपार? )
अमित साटम यांचा पोलिस स्थानकात तक्रार अर्ज
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व महाराष्ट्राचे राज्याचे मंत्री अस्लम शेख तसेच महापालिका चिटणीस यांच्या विरोधात फोर्जरी अर्थात कागदपत्रांची छेडछाड,खाडाखोड, दिशाभूल व मानहानीबाबत गुन्हा दाखल करावा अशाप्रकारची तक्रारीचे पत्र आमदार अमित साटत यांनी जुहू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिले आहे. यामध्ये साटम यांनी महापालिकेचे चिटणीस कार्यालय व महापौरांकडून केलेल्या फोर्जरीकडे लक्ष वेधुन घेतले आहे. यासंदर्भात एक कागद महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख यांच्यातर्फे व्हायरल झाले. त्यात एम पूर्व येथील एका रस्त्याला टिपु सुलतान यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला आपले नाव अनुमोदन दिलेले आहे,असे म्हटले आहे. त्यामध्ये भाजपच्या उपस्थित सदस्यांची यादीही जोडली आहे. परंतु अनुमोदकाच्या ठिकाणी खाडाखोड करून माझे नाव लिहिलेले आहे,असे या तक्रारीच्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे फिरवलेले हे पत्र पूर्णपणे खोटे असून नव्याने तयार केलेले आहे,असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community